पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले । Suresh Kalmadi Passed Away
वयाच्या ८१व्या वर्षी प्राणज्योत मालवली
पुणे | प्रतिनिधी
ज्येष्ठ काँग्रेस नेते, पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. दीर्घकालीन आजारामुळे त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाच्या हवाल्याने देण्यात आली. सुरेश कलमाडी यांच्या निधनामुळे पुण्यातील तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (Suresh Kalmadi Passed Away)
‘गुन्हेगाराची पत्नी असली तर दोष काय?’ अजित पवारांचा थेट सवाल, टीकेला जोरदार प्रत्युत्तर
अंत्यदर्शन व अंत्यसंस्काराची माहिती
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव एरंडवणे येथील ‘कलमाडी हाऊस’ येथे आज दुपारी २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास नवी पेठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
प्रदीर्घ राजकीय कारकीर्द
सुरेश कलमाडी हे अनेक वर्षे पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९९५ ते १९९६ या काळात काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारमध्ये त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. याशिवाय त्यांनी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्षपद भूषवले होते. क्रीडा क्षेत्रातही त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहिला.
पायलट म्हणून कारकीर्दीची सुरुवात
राजकारणात येण्याआधी सुरेश कलमाडी यांनी १९६४ ते १९७२ या काळात भारतीय हवाई दलात पायलट म्हणून सेवा बजावली. १९७४ साली ते सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि पुढे राजकारणात सक्रिय झाले.
राष्ट्रकुल स्पर्धा वाद
२०१० साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांदरम्यान सुरेश कलमाडी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. एप्रिल २०११ मध्ये या प्रकरणात त्यांच्यावर दोषसिद्धीही झाली. तरीही क्रीडा क्षेत्रात, विशेषतः ऑलिम्पिकशी संबंधित संघटनांमध्ये त्यांचा प्रभाव काही काळ कायम राहिला. २०१६ साली सुरेश कलमाडी आणि अभय सिंह चौटाला यांची भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या पॅनलचे आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कलमाडी यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता.
अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले – अजित पवार
माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनुभवी ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करत माजी खासदार सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात की , भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून सुरेश कलमाडी यांनी पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले. त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ सारख्या उपक्रमांमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली. पुणे शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

