...

Pune ZP Election। जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज !

३० लाख मतदार बजावणार हक्क

Pune ZP Election। पुणे : ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (दि. ७) जिल्ह्यात मतदान पार पडणार आहे. तब्बल ३,६०५ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया राबवली जाणार असून सुमारे ३० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी २३,११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 जिल्हा परिषद : २९९ उमेदवार रिंगणात
जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमध्ये २९९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये १६४ पुरुष आणि १३५ महिला उमेदवारांचा समावेश आहे.वेल्हे तालुक्यात सर्वात कमी, केवळ ८ उमेदवार आणि विशेष म्हणजे येथे एकही महिला उमेदवार नाही.पंचायत समिती निवडणुकीत ५२८ उमेदवार रिंगणात आहेत.
* २७४ पुरुष, २५४ महिला उमेदवार
* इंदापूरमध्ये सर्वाधिक ७२ उमेदवार
* वेल्हेत सर्वात कमी २० उमेदवार

मतदारसंख्या
जिल्ह्यात एकूण २९,७६,४५४ मतदार नोंदणीकृत आहेत.
* पुरुष : १५,२६,९८६
* महिला : १४,४९,३७३
* इतर : ९५

मतदान केंद्रांची तयारी
१३ तालुक्यांमध्ये ३,६०५ मतदान केंद्रे तयार असून १३ आदर्श व महिला मतदान केंद्रे असतील. येथे रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, सजावट व जनजागृती फलकांची व्यवस्था असेल. हवेली, भोर आणि इंदापूर येथे प्रत्येकी एक परदानशीन मतदान केंद्र असेल.

 मतदान यंत्रांची व्यवस्था
या निवडणुकीसाठी ३,६९३ मतदान यंत्रे आणि ३,६०५ कंट्रोल युनिट्स वापरण्यात येणार आहेत. बिघाड झाल्यास १४,३३८ पर्यायी यंत्रे उपलब्ध ठेवली आहेत.बारामती, मुळशी व इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गणात दोन यंत्रांचा वापर होणार आहे.

अशी आहे सुरक्षा व्यवस्था
१३ ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या असून तेथे २४ तास सुरक्षा असेल. मतदार यादीत असलेल्या ६७ हजार दुबार मतदारांकडून हमीपत्र घेतले जात आहे. मागील निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर यावेळी पुन्हा पारंपरिक इंडेलिबल इंक (शाई) वापरण्यात येणार आहे.

Local ad 1