पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतून मिळणाऱ्या पाण्याच्या बिलाची सुमारे ९४८ कोटी रुपयांची थकबाकी सोमवार (२३ तारखेपर्यंत) भरली नाही, तर मंगळवार (२४ तारखेपासून) पुण्याचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई, असा गंभीर इशारा जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला दिला आहे. या इशाऱ्यामुळे शहरात संभाव्य पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. (pune water supply warning 948 crore dues pmc khadakwasla)
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, पुणे शहरासाठी खडकवासला प्रकल्पातून दरवर्षी ११.६० टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात पुणे महानगरपालिका दरवर्षी या कोट्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करत असल्याचे सांगितले जाते. विभागाच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिका दरवर्षी सुमारे ८ ते ८.५ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरत आहे.
Pune water tanker demand। उन्हाळ्याआधीच पुण्यात पाणीटंचाई ; टँकरची मागणी झपाट्याने वाढली
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमांनुसार मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरल्यास दंडासह पाणीपट्टी आकारली जाते. त्यानुसार पुणे महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपये जलसंपदा विभागाला देणे अपेक्षित आहे. मात्र मागील काही वर्षांत पूर्ण रक्कम नियमितपणे जमा न झाल्याने थकबाकी वाढत जाऊन ती ९४८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये २०१ कोटी ७८ लाख रुपये, तर २०२४-२५ मध्ये २३२ कोटी ९ लाख रुपये पाणीपट्टी म्हणून जमा करण्यात आले. मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत केवळ ९७ कोटी २३ लाख रुपयेच जमा झाले आहेत.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त Naval Kishore Ram यांनी जलसंपदा विभागाकडे ४११ कोटी रुपये अतिरिक्त जमा असल्याचा दावा केला आहे. मात्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावत, या विधानाचा आधार काय आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर्षी मंजूर ११.६० टीएमसी कोट्याच्या तुलनेत महानगरपालिकेने आतापर्यंत १२.८४ टीएमसी पाणी वापरले असून, १.२४ टीएमसी अतिरिक्त पाणी घेतल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या अतिरिक्त पाण्याची किंमत कोण भरणार, असा सवालही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय महानगरपालिका आणि जलसंपदा विभागामधील करारानुसार शहरातून नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र सुमारे १३ टीएमसी सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यावरही दंड आकारण्यात आला आहे. हा दंडही अद्याप न भरल्याचे विभागाने सांगितले. जलसंपदा विभागाने थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेला दोन वेळा नोटीस बजावली आहे. तरीही अपेक्षित रक्कम जमा न झाल्याने आता पाणीपुरवठा बंद करण्याच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

