पुणे : पुणेकरांनी हाती दिलेला महापालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालवा. महापालिका हा कमिशन मिळविण्याचा धंदा किंवा व्यवसाय नाही. कोणतीही चूक, गैरप्रकार किंवा पारदर्शकतेचा अभाव खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांना दिला. (pune municipal corporation devendra fadnavis warning bjp corporators)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपच्या नवोदित नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पारदर्शक कारभारावर भर दिला. या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यात घडले मोठे राजकीय बदल ! महापालिकेत महिलाराज कसा आला ?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भाजपने पुण्यात ऐतिहासिक यश मिळवले आहे. स्थानिक नेते आणि नगरसेवक हे या विजयाचे शिल्पकार आहेत. गेल्या ३० ते ३५ वर्षांत पुण्यात कोणत्याही पक्षाला एवढे प्रचंड बहुमत मिळाले नव्हते. पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत भाजपला कौल दिला आहे.”
निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठे आव्हान उभे राहिले होते. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “माध्यमांत पुण्यातील लढत चुरशीची असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र तुम्ही ही लढत एकतर्फी विजयात रूपांतरित केली. पुण्यात ११९ नगरसेवक निवडून येणे हा अभूतपूर्व आकडा आहे. एवढे बहुमत मिळाल्यावर जबाबदारी अधिक वाढते. जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारे काम केले, तर पुढील २५ वर्षे कुणीही आपल्याला हलवू शकणार नाही.”
विजयाच्या उन्मादापासून दूर राहण्याचा सल्ला देत मुख्यमंत्री म्हणाले, “विजय क्षणिक असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही विजयानंतर शांत बसले नाहीत, ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागतात. त्याच पद्धतीने पुण्याच्या पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करा.”
महापालिकेतील विविध समित्यांच्या नियुक्त्यांबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “कोणाला संधी मिळेल, कोणाला मिळणार नाही, पण मिळालेल्या बहुमतापेक्षा कोणतेही पद मोठे नाही. मला हेच पद मिळायला हवे, अशी नाराजी निर्माण झाली तर पुणेकर माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला.
“सत्तेचा उन्माद, पारदर्शकतेचा अभाव आणि गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. कोणीही कितीही मोठा असला तरी गय केली जाणार नाही. पुणेकरांना तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण केल्या नाहीत तर सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,” असे स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुढील दोन वर्षांत विकास आराखड्याची अंमलबजावणी दिसली पाहिजे, असे सांगत त्यांनी राज्य व केंद्र सरकार पुण्याच्या पाठीशी असल्याचेही स्पष्ट केले. “पुणे ही देशातील सर्वोत्तम महापालिका व्हावी, यासाठी काम करा. तुमची प्रतिमा हीच भाजपची प्रतिमा आहे. चांगली प्रतिमा निर्माण केली तर मागे वळून पाहावे लागत नाही,” असा सल्ला देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण समाप्त केले.
प्रश्न–उत्तर
प्रश्न 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना काय इशारा दिला?
उत्तर : महापालिकेचा कारभार पारदर्शक ठेवा, कमिशनबाजी व गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
प्रश्न 2 : पुणे महापालिकेत भाजपला किती नगरसेवक निवडून आले?
उत्तर : पुणे महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले असून हा ऐतिहासिक बहुमताचा आकडा आहे.
प्रश्न 3 : मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरसेवकांना कोणता सल्ला दिला?
उत्तर : विजयाचा उन्माद टाळून विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, पदापेक्षा पक्ष आणि जनतेचा विश्वास मोठा आहे, असा सल्ला दिला.
प्रश्न 4 : पुण्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
उत्तर : पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करून पुढील दोन वर्षांत त्याची अंमलबजावणी दिसली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

