...

पुणेकरांनो लक्ष द्या ! १ मेपासून तुमच्या घरी येणार जनगणना अधिकारी

 

पुणे : भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्या वतीने होणाऱ्या भारत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरांची यादी व घरगणना (House Listing & Housing Census) हे काम १ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत पुणे महानगरपालिका हद्दीत राबविण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात पार पडणार आहे.

 

जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार पुणे शहरातील १५ चार्ज जनगणना अधिकारी तसेच शहर जनगणना अधिकारी यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

 

बैठकीदरम्यान जनगणनेचे सर्व कामकाज निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यंदा प्रथमच देशभरात डिजिटल पद्धतीने जनगणना होणार असून, त्यासाठी जनगणना प्रगणकांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण तसेच तांत्रिक तयारी शासनाच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

 

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जनगणना यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. डिजिटल प्रणालीमुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

Local ad 1