World Blood Donor Day 2025 Special | रक्तदान शिबिरांची संख्या घटली; पुण्यात रुग्णांना रक्त मिळणे कठीण !
जागतिक रक्तदाता दिन 2025 निमित्त नागरिकांनी पुढाकार घ्या
World Blood Donor Day 2025 Special | पुणे : पुण्यात महाविद्यालयांच्या सुट्ट्या, रोगांच्या साथी आणि पावसाळा यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने गंभीर रक्तटंचाई निर्माण झाली आहे. सध्या पुण्यात दररोज शस्त्रक्रिया व अन्य वैद्यकीय गरजांसाठी सुमारे दीड हजार (1500) रक्तपिशव्यांची मागणी आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ३०० ते ४०० रक्तपिशव्या उपलब्ध होत असल्याचे रक्तपेढ्यांतील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. सध्या अनेक महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे नियमितपणे आयोजित होणारी रक्तदान शिबिरे होऊ शकलेली नाहीत. याशिवाय सध्याच्या पावसाळी वातावरणात सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढल्याने रक्तदात्यांची उपलब्धता घटली आहे. परिणामी, रक्तपेढ्यांमध्ये साठा कमी झाला आहे आणि रुग्णालयांतील रुग्णांना वेळेत रक्त मिळण्यात अडचणी येत आहेत. (pune blood shortage world blood donor day 2025)
‘ए पॉझिटिव्ह’ आणि ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचा तुटवडा
सध्या पुण्यात ‘A Positive’ व ‘B Positive’ या रक्तगटाच्या पिशव्यांची कमतरता अधिक तीव्र आहे. पुण्यात एकूण ३५ रक्तपेढ्या कार्यरत असून यामध्ये ससून रुग्णालय, जनकल्याण, सह्याद्री, रूबी हॉल क्लिनिक आणि केईएम यासारख्या प्रमुख रक्तपेढ्यांचा समावेश आहे. (pune blood shortage world blood donor day 2025)
पुणे महापालिकेच्या झाडणकामाच्या निविदांवर ‘रिंग’चा वाद; आता फेरनिविदा जुन्या अटींसह
नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज
‘रक्ताचे नाते’ चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राम बांगड म्हणाले की, “सध्या दररोज ४० ते ५० कॉल्स रक्तासाठी येतात. मात्र त्यातून केवळ १० ते १५ रक्तदाते उपलब्ध होतात. त्यामुळे पुणेकरांनी नियमित रक्तदान करणे गरजेचे आहे. नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात जाऊन रक्तदान करावे आणि शिबिरांचे आयोजन करावे.” असे आवाहन त्यांनी केले आहे. राम बांगड यांनी यावेळी काही रक्तपेढ्यांवर व्यापारी पद्धतीने काम करण्याचा आरोप केला. “काही रक्तपेढ्या रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाते आणण्यास भाग पाडतात. रक्तदात्यांना योग्य सन्मान दिला जात नाही व शिबिर आयोजकांना प्राथमिकतेने रक्त मिळत नाही.”
रक्तदान ही जीवनदानाची संधी : तज्ज्ञांचे मत
इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनो हेमॅटॉलॉजी (ISBTI) च्या सचिव डॉ. पौर्णिमा राव म्हणाल्या, “रक्तदान हे जीवनदान आहे. नागरिकांनी कोणत्याही लोभाला बळी न पडता चांगल्या प्रमाणित रक्तपेढ्यांमध्येच रक्तदान करावे. थॅलेसेमियासारख्या रुग्णांना नियमित रक्ताची गरज असते, त्यामुळे या चळवळीला प्रशासनाचा सक्रिय पाठिंबा मिळायला हवा.”
महत्वाचे ! महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपरिषद प्रभाग रचना कार्यक्रम २०२५ जाहीर
प्रशासनाकडून मात्र रक्ताचा तुटवडा नसल्याचा दावा
दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी सांगितले की, “पुणे विभागात १०८ रक्तपेढ्या कार्यरत असून सर्व प्रकारचे रक्त घटक उपलब्ध आहेत. सध्या पुण्यात रक्ताचा कोणताही तुटवडा नाही.”
पुण्यातील रक्तसाठा (राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माहितीनुसार)
रक्तगट | महाराष्ट्र | पुणे |
---|---|---|
A पॉझिटिव्ह | ६७०० | ११०० |
A निगेटिव्ह | ६०१ | ० |
B पॉझिटिव्ह | ८००० | १४४० |
B निगेटिव्ह | ७२६ | ० |
AB पॉझिटिव्ह | २५०० | ३९० |
AB निगेटिव्ह | ३०२ | ० |
O पॉझिटिव्ह | १०००० | १५०० |
O निगेटिव्ह | ७४३ | ० |
प्लेटलेट्स | २१०० | ४४१ |
नियमित रक्तदानाचा संदेश
जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day 2025) दरवर्षी १४ जून रोजी साजरा केला जातो. रक्तगट पद्धतीचा शोध लावणारे कार्ल लँडस्टायनर यांचा हा जन्मदिवस आहे. या दिनानिमित्त पुणेकरांनी नियमित रक्तदान करून या संकटावर मात करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.