जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील ७९ देशातील रक्तपुरवठ्यापैकी ९० टक्के ऐच्छिक रक्तदात्यांकडून होतो. तर ५४ देशात हे प्रमाण ५० टक्के आहे. इतर रक्तपुरवठा कुटुंबातील व्यक्ती किंवा पैसे मोजून इतर व्यक्तींकडून रक्ताची गरज भागवली जाते. जगातील एकूण रक्तदात्यांपैकी ३३ टक्के महिला आहेत. एकूण रक्त संकलनापैकी ४० टक्के श्रीमंत राष्ट्रात संकलीत केले जाते.
- मागील तीन महिन्यापासून रक्तदान न केलेले १८ ते ६५ वयोगटातील कोणीही रक्तदान करू शकते. रक्तदान करणाऱ्याचे वजन साधारण ४८ किलोपेक्षा अधिक असायला हवे. प्रसुतीनंतर ६ महिन्यांनी स्त्रीया रक्तदान करू शकतात. क्षयरोग, हिपाटायटीस, मधुमेह, मलेरिया सारखे आजाराने पीडित नसणाऱ्या व्यक्ती रक्तदान करू शकतात. दररोज आपल्या शरीरात नवे रक्त तयार होत असते. रक्तदानासाठी एकावेळी ३५० मिली रक्तच घेतले जाते. परवाना असलेली रक्तपेढी किंवा शासकीय रुग्णालयात रक्तदान करता येते. रक्तदान केल्यानंतर १२ महिन्यापर्यंत रक्तदाता किंवा त्याच्या कुटुंबियातील व्यक्तीस रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त देण्यात येते.