...

राष्ट्रवादीच्या दोन गटांचा पुण्यात शक्तिप्रदर्शन ; कार्यकर्त्यांचे लक्ष एकवटले !

एकेकाळचा बालेकिल्ला आता विभागलेला

पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत येताना दिसत आहे. वर्धापनदिना निमित्त दोन्ही गटांनी – अजित पवार आणि शरद पवार  पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. हे केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, दोन्ही गटांचे पुण्यातील राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. (ncp ajit sharad pawar pune anniversary showdown)

 

एकेकाळी हा परिसर पक्षाचा बालेकिल्ला होता 

पुणे जिल्हा हा शरद पवरांच्या नेतृत्वात एकेकाळी बालेकिल्ला मानला जात होता. काँग्रेसमधून वेगळे झाल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पार्टीने येथे प्रभावी पकड निर्माण केली होती. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषदेत वर्चस्व होते. मात्र, अजित पवारांच्या नेतृत्वाखालील फुटीनंतर पक्ष दोन गटांत विभागला.

 

“स्थानिक निवडणुकीत एकला चलो की आघाडी? – सुप्रिया सुळे यांचा निर्णायक इशारा !

 

 

‘दादा’ गटाचा बालेवाडीत मेगा शो

उपमुख्यमंत्री अजित पवार बालेवाडीत वर्धापनदिन साजरा करणार आहेत. जिल्हा परिषद, पिंपरी -चिंचवड आणि पुणे महापालिकेत त्यांचे मोठ वर्चस्व राखले आहे. अनेक नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारी अजित पवारांसोबत आहेत. त्यांचा मेळावा हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताकद दाखवणारा आणि संघटन पुनर्रचनेचा भाग ठरणार आहे. चेतन तुपे यांची विधानसभा निवडणूक विजयी ठरल्यामुळे पुणेतील जनाधार अजित गटाकडे वळल्याचे संकेत मिळाले होते.

 

‘साहेब’ बालगंधर्व रंगमंदिरात समर्थकांसोबत

शरद पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम आयोजित केला  जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरीनंतर पक्षाला नवसंजीवनी आली आहे. पुणे शहरात बापू पठारे यांच्यासारखे आमदार विजयी झाल्यामुळे या गटालाही जनाधार आहे. साहेबांचे अनेक समर्थक विविध आंदोलनांच्या माध्यमातून सक्रिय राहिले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या संघटनात्मक ताकदीचा कस हा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून लागणार आहे.

 

आगामी निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून पाहिला जात आहे

दोन स्वतंत्र कार्यक्रमातून नेतृत्वाच्या प्रभावाची चाचपणी होणार आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांचा कल कोणत्या बाजूने झुकतो, हे यावरून स्पष्ट होईल. यामुळेच हा वर्धापनदिन केवळ एक उत्सव नसून, आगामी निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून पाहिला जात आहे.

Local ad 1