“निवडणूक प्रचार नाही, संस्कारांची सुरुवात !” भाजपच्या कचेरीचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजनाने उद्घाटन
पुणे : भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन एका अनोख्या आणि भावनिक सोहळ्यात पार पडले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. (bjp ward 25 election office inauguration senior workers padyapujan pune)
“निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून, संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी आम्हा उमेदवारांवर असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि परिश्रम आहेत,” असे भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. याच भावनेतून प्रभाग क्रमांक २५ मधील मीरा पावगी, ज्योत्स्ना सरदेशपांडे, रमेश परचुरे, किरण सरदेशपांडे यांच्या हस्ते निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
या हृद्य सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ, श्रेयस लेले यांची उपस्थिती लाभली.

