MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन ! मायलेकींचा १२ वर्षांचा संघर्ष, अखेर स्वप्न साकार

देशी गुलाबापासून वाइन निर्मितीचा प्रयोग ; १२ वर्षांच्या संशोधनानंतर पहिल्या ३०० बाटल्या तयार, शेती आणि महिला उद्योजकतेला बळ देण्याचा प्रयत्न

 

MH Times Special Story पुणे : महिलांनी उद्योग सुरू करावा, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे बोलले जाते; मात्र एखादी महिला रूढ चौकटीबाहेर जाऊन नवा प्रयोग करू लागली की तिला सामाजिक प्रश्नांना आणि व्यवस्थेतील अडथळ्यांना सामोरे जावे लागते. पुण्यातील जयश्री यादव आणि त्यांची कन्या कश्मीरा यादव यांचा प्रवास याचे उदाहरण आहे. देशी गुलाबाच्या फुलांपासून वाइन (Rose Wine India) तयार करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी सुमारे १२ वर्षे प्रयोग केले. परवानग्यांसाठी प्रशासकीय लढा दिला, सामाजिक विरोध सहन केला; पण माघार घेतली नाही. त्यांच्या या प्रयत्नांतून ‘रोजलाइन’ या गुलाबाच्या वाइनच्या पहिल्या सुमारे ३०० बाटल्या तयार झाल्या आहेत. एका नव्या उत्पादनाच्या निर्मितीबरोबरच महिला उद्योजकतेची जिद्द आणि कृषी उत्पादनाला मूल्यवर्धित स्वरूप देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून पुढे आला आहे.

 

 

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडून

 

गुलकंदापासून वाइनपर्यंतचा प्रवास 
जयश्री यादव यांच्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात २००१ मध्ये गुलकंद निर्मितीपासून झाली. त्याआधी त्यांनी हर्बल लागवड आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले होते. गुलकंदाबरोबरच गुलाबपाणी, गुलाबाचे सरबत, वाळा सरबत आणि आवळा कँडी अशी उत्पादने तयार करत त्यांनी कृषीआधारित प्रक्रिया उद्योग उभा केला. या कामातून गुलाबाच्या फुलांचा सुगंध आणि त्यांचा व्यावसायिक वापर याविषयीची त्यांची समज वाढत गेली.

२००८ मध्ये गुलाबापासून वाइन तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. महिलांसाठी पेयांच्या क्षेत्रात नवे पर्याय निर्माण व्हावेत, तसेच गुलाबाच्या फुलांचा वेगळ्या प्रकारे उपयोग व्हावा, हा त्यामागील विचार होता. मात्र, कल्पना सुचणे आणि तिचे व्यावसायिक उत्पादनात रूपांतर होणे यांत मोठे अंतर होते. त्यासाठी संशोधन, सातत्यपूर्ण प्रयोग, तांत्रिक ज्ञान आणि भांडवलाची गरज होती. यादव मायलेकींनी या आव्हानांचा सामना करत प्रयोग सुरू ठेवले.

 

परवानग्यांसाठी वर्षानुवर्षांचा संघर्ष
२०१४ मध्ये वाइनरीचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्पादनासाठी शासकीय परवानग्या मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, फुलांपासून वाइन निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या नियमांची आणि परवान्यांची प्रक्रिया हा मोठा अडथळा ठरला. नव्या उत्पादनासाठी प्रशासकीय स्तरावर मार्ग काढताना अनेक वर्षे गेली. २०१७-१८ च्या सुमारास आवश्यक मंजुरी आणि नियमांतील बदलांची प्रक्रिया पुढे सरकली. २०२० मध्ये भारतीय पेटंट मिळाले, तर २०२३ मध्ये उत्पादनाचा अधिकृत परवाना मिळाल्याचे यादव यांनी सांगितले.

या काळात आर्थिक अडचणींसोबतच सामाजिक विरोधाचाही सामना करावा लागला. नवा प्रयोग सोडून देण्याचा सल्ला देणारे अनेक जण होते. विशेषतः महिलांनी नव्या क्षेत्रात पाऊल टाकताना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याचा अनुभव त्यांना आला. मात्र, कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या प्रवासात जिद्दीइतकेच सातत्य आणि स्वतःच्या कल्पनेवरील विश्वास महत्त्वाचा ठरला.

 

आईचा अनुभव, मुलीचे तांत्रिक ज्ञान
या उद्योगाला व्यावसायिक स्वरूप देण्यात कश्मीरा यादव यांचे तांत्रिक ज्ञान महत्त्वाचे ठरले. त्यांनी वाइन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइनविषयक अभ्यास केला. वाइन अँड स्पिरिट एज्युकेशन ट्रस्टच्या (डब्ल्यूएसईटी) तीनही स्तरांच्या परीक्षा पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. आईचा कृषीप्रक्रिया उद्योगातील अनुभव आणि मुलीचे तांत्रिक शिक्षण यांचा मेळ घालून या उत्पादनाच्या निर्मितीला दिशा मिळाली.

चाकण परिसरातील स्वतःच्या जागेवर गुलाबाची लागवड आणि प्रक्रिया केली जाते. याशिवाय स्थानिक शेतकऱ्यांकडून गुलाबाची फुले खरेदी करण्यावरही भर दिला जातो. त्यामुळे या उद्योगातून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविल्यास ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, हे या उपक्रमाचे महत्त्वाचे अंग आहे.

 

गुलाबाच्या सुगंधाला जागतिक बाजारपेठेची आस
‘रोजलाइन’ या गुलाबाच्या वाइनचे आंतरराष्ट्रीय ‘प्रोवाइन’ प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले. सध्या पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० बाटल्या तयार करण्यात आल्या आहेत. उत्पादनाचा विस्तार करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याचे यादव मायलेकींचे उद्दिष्ट आहे. पुढे द्राक्षे आणि अन्य फळांपासून वाइन तयार करण्याचाही त्यांचा विचार आहे.

या प्रवासाचे महत्त्व केवळ गुलाबापासून वाइन तयार करण्यात नाही. पारंपरिक कृषीप्रक्रिया उद्योगातून नव्या उत्पादनाच्या निर्मितीकडे वाटचाल करताना महिलांनी संशोधन, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची सांगड कशी घालता येते, हे यादव मायलेकींनी दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांतून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मूल्यवर्धन आणि स्थानिक संसाधनांचा व्यावसायिक वापर अशा अनेक शक्यता पुढे येतात. एका कल्पनेवर विश्वास ठेवून त्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करण्याची तयारी असेल, तर अडथळ्यांमधूनही नवी वाट निर्माण करता येते, हा संदेश त्यांच्या प्रवासातून मिळतो.

Local ad 1