FDA Raid Pune। सणासुदीपूर्वी खाद्यतेलावर FDAचा मोठा छापा; पुणे विभागात १.२९ कोटींचे तेल जप्त
पुणे जिल्ह्यातील आठ प्रतिष्ठानांवर कारवाई; पाच जिल्ह्यांतून ७४.६१ टन तेल ताब्यात
FDA Raid Pune। पुणे : सणासुदीच्या काळात बाजारात विक्री होणाऱ्या खाद्यतेलाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील २५ प्रतिष्ठानांवर छापे टाकून ७४,६१२ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. जप्त तेलाची किंमत सुमारे १ कोटी २९ लाख रुपये आहे. शुक्रवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान तेलाची गुणवत्ता, सुरक्षितता, लेबलिंग, पॅकेजिंग तसेच उत्पादन आणि साठ्याशी संबंधित नोंदींमध्ये विविध त्रुटी आढळल्या. जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवालानंतर संबंधित व्यावसायिकांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
पुण्यात १ नोव्हेंबरला ‘रन फॉर युनिटी’ ; ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा
पुणे जिल्ह्यात ३४.४८ टन तेल जप्त
या मोहिमेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक खाद्यतेल जप्त करण्यात आले. जिल्ह्यातील आठ प्रतिष्ठानांमधून ३४,४८१ किलो तेल ताब्यात घेण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ५८.९० लाख रुपये आहे. बारामती, चाकण, जुन्नर, मुळशी, पुणे शहर आणि गुलटेकडीसह विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान काही प्रतिष्ठानांमध्ये प्रयोगशाळा कार्यरत नसणे, केमिस्ट अनुपस्थित असणे, जुन्या टिनचा पुनर्वापर करणे आणि तेलाच्या साठवण टाक्यांसाठी सामायिक पाइपलाइन वापरणे अशा त्रुटी आढळल्या. काही ठिकाणी बॅचनिहाय तपासणी अहवाल, साठा नोंदवही तसेच खरेदी आणि उत्पादनासंबंधी कागदपत्रे उपलब्ध नव्हती. चाकण येथील एका युनिटच्या परवान्यात काही प्रकारच्या तेलांचा समावेश नसल्याचेही निदर्शनास आले.
सोलापूर, कोल्हापूरमध्येही मोठी कारवाई
जिल्हानिहाय कारवाईत सोलापूरमधील पाच प्रतिष्ठानांतून १३,४९०.४ किलो तेल जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे २५.३३ लाख रुपये आहे. कोल्हापूरमधील चार प्रतिष्ठानांतून १८,१५६ किलो तेल जप्त करण्यात आले असून, त्याचे मूल्य सुमारे २९.०३ लाख रुपये आहे.सातारा जिल्ह्यातील चार प्रतिष्ठानांतून ५,९४८.१५ किलो, तर सांगलीतील चार प्रतिष्ठानांतून २,५३६.४६ किलो तेल जप्त करण्यात आले. सोलापूरमधील काही तेलाच्या पाकिटांवर बॅच क्रमांक, कमाल किरकोळ विक्री किंमत (एमआरपी) आणि वापरण्याच्या कालावधीसंबंधी माहितीमध्ये त्रुटी आढळल्या. सातारा येथील एका प्रतिष्ठानावर वैध परवान्याशिवाय व्यवसाय करणे आणि वापरलेल्या टिनमध्ये तेल भरण्याचा ठपका ठेवण्यात आला. सांगलीतील एका प्रतिष्ठानाला व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील निर्णय
खाद्यतेल निर्धारित मानकांनुसार नसण्याची, असुरक्षित असण्याची किंवा चुकीचे लेबल लावल्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याची प्रकरणेही तपासणीदरम्यान समोर आली आहेत. खाद्यतेल उत्पादक आणि विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन FDAने केले आहे. खाद्यतेल किंवा इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास ग्राहक १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच FDAच्या ऑनलाइन तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवता येईल.

