पुण्यात १ नोव्हेंबरला ‘रन फॉर युनिटी’ ; ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा
मुरलीधर मोहोळ यांची माहिती; राष्ट्रीय एकात्मता, फिटनेस आणि व्यसनमुक्तीचा संदेश, १० लाखांहून अधिक रुपयांची पारितोषिके
पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीत ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. आतापर्यंत २० हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याबरोबरच नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विशेषतः तरुणांना व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. (pune run for unity 2026 registration)
पाच गटांत धावस्पर्धा
‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’मध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश आहे. त्यामुळे अनुभवी धावपटूंसह प्रथमच धावण्याच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनाही संधी मिळणार आहे. विविध स्पर्धात्मक गटांमध्ये एकूण १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. देश-विदेशातील नामांकित धावपटूही या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
Pune PMC sweeping mapping। पुणे मनपाच्या झाडूकाम नियोजनात घोळ ; रस्त्यांची लांबी साडेतीनपट दाखवली
गेल्या वर्षी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
गेल्या वर्षी आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी २०२५’ला २५ हजारांहून अधिक नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यापैकी १० हजारांहून अधिक स्पर्धात्मक धावपटूंनी १० किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. केनिया आणि इथिओपियासह विविध देशांतील धावपटूही या स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा सहभागींची संख्या ४० हजारांपार नेण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी ठेवले आहे.
‘नशामुक्त युवा – विकसित भारत’चा संदेश
यंदाच्या दौडीची प्रमुख संकल्पना ‘नशामुक्त युवा – विकसित भारत २०२६’ अशी आहे. तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच क्रीडा, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करणे, यावर भर दिला जाणार आहे.“सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रीय एकात्मतेसाठीचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ही दौड केवळ क्रीडा स्पर्धा नसून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा लोकसहभागाचा उपक्रम आहे. पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले.
बजाज फिनसर्व मुख्य प्रायोजक
या उपक्रमासाठी बजाज फिनसर्व मुख्य प्रायोजक आहे. पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस, अमूल, महामेट्रो पुणे, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चितळे बंधू यांच्यासह विविध संस्था आणि ब्रँड्सचे सहकार्य लाभणार आहे.
नोंदणीसाठी संकेतस्थळ: https://www.runbuddies.club/puneunityrun

