Pune PMC sweeping mapping। पुणे मनपाच्या झाडूकाम नियोजनात घोळ ; रस्त्यांची लांबी साडेतीनपट दाखवली
खासगी सोसायट्यांतील रस्त्यांचाही समावेश; नियोजनावर प्रश्नचिन्ह
पुणे : शहरातील स्वच्छतेसाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या परफॉर्मन्स बेस्ड झाडूकाम उपक्रमाच्या नियोजनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी सुमारे २३९६ किलोमीटर असताना, झाडूकामाच्या मॅपिंगमध्ये तब्बल साडेआठ हजार किलोमीटर रस्ते दाखवण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या सोसायट्यांतील अंतर्गत खासगी रस्त्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मॅपिंगची फेरतपासणी करून खासगी आणि दुबार मोजणी झालेले रस्ते वगळण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
Nana Patekar funeral : नानाची वाडीत शासकीय इतमामात नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप
मनुष्यबळ साडेचार हजारांवरून नऊ हजारांवर
झाडूकामासाठी ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांची संख्या साडेचार हजारांवरून थेट नऊ हजार करण्यात आली. त्यासाठी शहरातील झाडूकामाच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या. प्रत्येक ७०० मीटरच्या हद्दीनुसार मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले. मात्र, हद्दी निश्चित करण्यापूर्वी रस्त्यांची अचूक मोजणी आणि वर्गवारी करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
परिणामी, सार्वजनिक रस्त्यांसोबत खासगी सोसायट्यांतील अंतर्गत रस्त्यांचाही मॅपिंगमध्ये समावेश झाला. तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. मात्र, त्याच बैठकीत मॅपिंगमधील त्रुटी मान्य करण्यात आल्या. सुधारित हद्दी निश्चित करण्याचे आदेशही देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर झाडूकामासाठी प्रत्यक्षात किती किलोमीटरचे रस्ते निश्चित केले आहेत, त्यासाठी किती कर्मचारी नेमले आहेत आणि किती खर्च अपेक्षित आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनेक कायमस्वरूपी सफाई कर्मचारी वर्षानुवर्षे गैरहजर असल्याचेही बैठकीत समोर आले. पाच वर्षांहून अधिक काळ सतत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर बदली किंवा बडतर्फीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे कायमस्वरूपी कर्मचारी गैरहजर आहेत, तर दुसरीकडे ठेकेदारांकडील मनुष्यबळ दुप्पट करण्यात आले आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आणि झाडूकामाचे नियोजन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

