अस्थिरोगाच्या उपचारात शस्त्रक्रियेलाच पर्याय मानू नका; ‘ऑफिस ऑर्थोपेडिक्स’वर तज्ज्ञांचा भर
पुण्यात २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान ‘OfficeOrthoCon26 ’
OfficeOrthoCon26 पुणे : अस्थिरोगाच्या उपचारासाठी प्रत्येक वेळी शस्त्रक्रियेची गरज नसते. योग्य निदान, जीवनशैलीतील बदल, फिजिओथेरपी आणि गरजेनुसार इतर शस्त्रक्रियाविरहित उपचारांच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर प्रभावी उपचार करता येऊ शकतात. याच दृष्टिकोनातून अस्थिरोगातील ‘ऑफिस ऑर्थोपेडिक्स’ या शस्त्रक्रियाविरहित उपचारपद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ऑफिसऑर्थोकॉन २६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्लोबल असोसिएशन ऑफ ऑफिस ऑर्थोपेडिक्स (GAOO) तर्फे ही परिषद २६ आणि २७ सप्टेंबर रोजी पुण्यातील हयात रीजन्सी येथे होणार आहे. त्यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी संचेती रुग्णालयात तीन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या असून, त्यामध्ये विविध उपचारपद्धतींची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आरोग्यसेवेत आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोबोटिक आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञान, अत्याधुनिक तपासण्या तसेच कमीत कमी छेदाच्या शस्त्रक्रिया उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, त्याचबरोबर उपचारांचा खर्चही वाढत आहे. त्यामुळे ‘महागडा उपचार म्हणजेच सर्वोत्तम उपचार’ हा समज बदलण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एन. जे. कर्णे गेल्या ४१ वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या ऑफिस ऑर्थोपेडिक्स समितीचे अध्यक्ष आहेत. देशातील अनेक अस्थिरोगतज्ज्ञ रुग्णांवर शस्त्रक्रियेशिवाय यशस्वी उपचार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यातून ऑफिस ऑर्थोपेडिक्ससाठी GAOO या संघटनेची स्थापना करण्यात आली.
शस्त्रक्रियाविरहित उपचारांचे प्रशिक्षण महत्त्वाचे
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि त्यानंतरच्या फेलोशिपमध्ये शस्त्रक्रियाकेंद्री प्रशिक्षणाला तुलनेने अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे शस्त्रक्रिया टाळण्याची इच्छा असली तरी अनेक डॉक्टरांना पर्यायी उपचारपद्धतींचे पुरेसे प्रशिक्षण मिळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी GAOO कडून अस्थिरोगतज्ज्ञांना शस्त्रक्रियेशिवाय रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञांनी विकसित केलेल्या विविध उपचारपद्धती आणि अनुभव एकत्र आणून त्यावर चर्चा, विचारविनिमय आणि पुराव्यांवर आधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
निदानापासून रुग्णसंवादापर्यंत प्रशिक्षण
‘ऑफिसऑर्थोकॉन २६’मध्ये अचूक निदान, सुसूत्र उपचारपद्धती, रुग्णांशी प्रभावी संवाद आणि बाह्यरुग्ण विभागात करता येणाऱ्या उपचारांचे कौशल्य यावर भर दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय तसेच देशातील नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, देशभरातून अस्थिरोगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेत विशेष कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग, रुग्णप्रकरणांवर आधारित चर्चा आणि पुराव्यांवर आधारित उपचारपद्धतींवरील सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. दैनंदिन वैद्यकीय व्यवहारात सहज वापरता येतील अशा उपचारपद्धती आणि प्रत्यक्ष आव्हानांवरही चर्चा होणार आहे.शस्त्रक्रियाविरहित उपचारांबाबत डॉक्टरांमध्ये ज्ञान आणि कौशल्य वाढवून बाह्यरुग्ण अस्थिरोग सेवेचा दर्जा उंचावणे, हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

