विशेष म्हणजे, पोलिसांच्या रेकॉर्डवरील वॉन्टेड किंवा सराईत गुन्हेगारांचे फोटो AI प्रणालीमध्ये अपलोड करण्यात आले आहेत. संबंधित व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेत आल्यास फेस रेकग्निशनच्या माध्यमातून नियंत्रण कक्षाला अलर्ट मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यात भाविकांची मोठी गर्दी होते. गणपती मंडळांचे दर्शन, देखावे आणि मिरवणुकांमुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी तसेच गर्दीचे व्यवस्थापन हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असते. यंदा या आव्हानाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.
शहरात सध्या सुमारे साडेतीन हजार कॅमेरे कार्यरत आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती पेठ परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणखी २५० ते ३०० AI कॅमेऱ्यांची भर पडली आहे. या कॅमेऱ्यांमध्ये नाइट व्हिजनसह सुमारे २८ प्रकारचे AI अॅनालिटिक्स लागू करण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांमधील दृश्यांकडे पोलिसांनी सतत पाहत बसण्याऐवजी विशिष्ट हालचाल किंवा घटना आढळल्यास त्याचा अलर्ट थेट नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात येताच संबंधित यंत्रणेला प्रतिसाद देण्यास मदत होणार आहे.
गर्दीतला संशयित कॅमेऱ्यांच्या नजरेत
पोलिसांच्या रेकॉर्डवरील वॉन्टेड किंवा सराईत गुन्हेगारांचे फोटो AI प्रणालीमध्ये अपलोड करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी संबंधित व्यक्ती कॅमेऱ्याच्या कक्षेत आली आणि तिचा चेहरा प्रणालीतील डेटाशी जुळला, तर फेस रेकग्निशनच्या माध्यमातून नियंत्रण कक्षाला अलर्ट मिळणार आहे. कंट्रोल रूममध्ये कॅमेऱ्यात दिसणारी व्यक्ती आणि पोलिसांच्या रेकॉर्डमधील व्यक्तीची तुलना करून पुढील कारवाई करता येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार आढळल्यास पोलिसांना त्याची माहिती तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.
गर्दी वाढली की मिळणार अलर्ट
गणेशोत्सवातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी शिवाजी रस्त्यासह प्रमुख मार्ग आणि गणपती मंडळांच्या परिसरात ‘पीपल काउंटिंग’ अॅनालिटिक्सचा वापर करण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी नागरिकांची संख्या अचानक वाढल्यास त्याची माहिती नियंत्रण यंत्रणेला मिळू शकते. त्यानुसार संबंधित भागात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियमन किंवा अन्य आवश्यक उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.
आग किंवा धूर दिसताच कॅमेऱ्याचा इशारा
AI कॅमेऱ्यांमध्ये ‘फायर डिटेक्शन’ आणि ‘स्मोक डिटेक्शन’ यांसारखे अॅनालिटिक्सही लागू करण्यात आले आहेत. एखाद्या परिसरात आग लागल्यास किंवा मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळू शकते. त्यानंतर घटनास्थळी पोलिस किंवा संबंधित यंत्रणेला तातडीने पाठविण्यास मदत होणार आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीने संशयास्पद वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवली आणि ती वस्तू बराच वेळ तेथेच राहिली, तर त्याबाबतही अलर्ट मिळण्याची सुविधा आहे. गर्दीच्या ठिकाणी बेवारस किंवा संशयास्पद वस्तूंमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका वेळीच लक्षात आणून देण्यासाठी या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.
कॅमेऱ्यांच्या ‘नजरे’त मध्यवर्ती पुणे
गणेशोत्सवातील गर्दी, वाहतूक आणि सुरक्षिततेचे आव्हान लक्षात घेऊन मध्यवर्ती पुण्यातील कॅमेऱ्यांच्या दृश्यांवर तसेच AI अॅनालिटिक्समधून मिळणाऱ्या अलर्टवर नियंत्रण कक्षातून सातत्याने देखरेख ठेवली जाणार आहे. रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांसोबतच नियंत्रण कक्षातूनही शहराच्या महत्त्वाच्या भागांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.
“गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीनशेच्या जवळपास AI कॅमेरे असून, त्यामध्ये जवळपास २८ प्रकारचे अॅनालिटिक्स लागू करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती कायम ठेवतानाच नियंत्रण कक्षातून तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील महत्त्वाच्या भागांवर अतिरिक्त नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.”
— विवेक पवार, सहायक पोलिस आयुक्त

