सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का; आंदेकर टोळीवर हल्ल्याची रेकी

पुणे : अंदेकर टोळीचा कृष्णा अंडेकर याच्यासह टोळीतील सदस्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने पोलिस बंदोबस्तातील वाहन ताफ्याची रेकी केल्याप्रकरणी सुरज ठोंबरे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मोक्काच्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

 

वेदांत रोहित सावंत (वय २१, रा. धनकवडी), अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज, मूळ रा. नाझरे, भोर), धीरज लखारा (रा. धनकवडी), सुरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ) आणि मानव शरद ढमाले (वय २४, रा. धनकवडी) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वेदांत, अथर्व आणि धीरज यांना अटक करण्यात आली असून, सुरज ठोंबरे आणि मानव ढमाले हे फरार आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा अंदेकर, तुषार आणि स्वराज वाडेकर यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस बंदोबस्तात त्यांना धुळे आणि नंदुरबार येथे नेण्यात आले होते. या वाहन ताफ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यात आल्याचा आरोप आहे. वेदांत सावंत, अथर्व खोपडे आणि धीरज लखारा यांनी संगनमताने अथर्वकडे असलेल्या अग्निशस्त्रासह ॲक्टिव्हावरून शिवाजीनगर न्यायालय ते कुरोळी-चाकणपर्यंत वाहन ताफ्याची रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

वाहन ताफ्याचे ठिकाण, हालचाली आणि पोलिस बंदोबस्ताची माहिती फोनद्वारे सुरज ठोंबरे याला देण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या टोळीतील सदस्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, शस्त्राचा धाक दाखवून धमकी देणे, बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे, मारामारी, दहशत निर्माण करणे, फौजदारी कट आणि बेकायदा जमाव जमविणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

 

टोळीने गुन्हेगारी कारवायांसाठी काही नवीन साथीदारांना सोबत घेतल्याचेही तपासात समोर आले. त्यामुळे संघटितपणे गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या या टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलिसांनी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे पाठविला होता. अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्यामार्फत हा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर मोक्का कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदल आणि सचिन सरपाले यांच्या पथकाने केली.

 

सुरज ठोंबरे हा अंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी मानला जात असून, अंडेकर आणि गायकवाड टोळीतील वादात ठोंबरे याने उडी घेतल्याचे यापूर्वी पोलिस तपासात समोर आले होते. या पार्श्वभूमीवर वाहन ताफ्याची रेकी केल्याच्या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहिले आहे.

Local ad 1