‘त्या’ प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे !

हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टच्या सदस्यांची मागणी

 

पुणे : भवानी पेठेतील दोन शेजारी ट्रस्टच्या मालमत्तांशी संबंधित घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्ट (HGMAT) आणि गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट (GJET) च्या सदस्यांमध्ये वाद झाला. या प्रकरणाशी संबंधित असलेले शाहिद इनामदार यांनी फेसबुक लाइव्ह केल्यानंतर त्याच दिवशी त्यांचे निधन झाले. त्यामुळे या घटनेकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे, असे मत हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे.

 

हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टच्या दाव्यानुसार सुरुवातीला हा वाद गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टमध्ये कथित अतिक्रमण किंवा प्रवेशासंदर्भातील असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नंतर हाजी गुलाम मोहम्मद आझम ट्रस्टशी संबंधित काही विश्वस्त आणि सदस्यांना त्यांच्या स्वतःच्या इमारतीत प्रवेश नाकारल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे नेमकी घटना कुठे घडली, साहित्य कोणाचे होते आणि ते कुठून हलविण्यात आले, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे, अशी मागणी सदस्यांनी केली.

 

HGMAT च्या विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार, CTS क्रमांक 646 वरील जमीन आणि इमारत त्यांच्या ट्रस्टच्या मालकीची आहे. त्यांच्या दाव्यानुसार, रविवारी सकाळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना हटवले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तेथे पोहोचले. मात्र, त्यांना गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्टशी संबंधित व्यक्तींनी प्रवेश नाकारल्याचे सांगितले. GJETची मालमत्ता शेजारील CTS क्रमांक 647 वर असल्याचे सांगितले.

 

तक्रारीनुसार, 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मागविण्यात आली होती. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर काही जण तेथून निघून गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी नेमके काय पाहिले, हे समोर आले पोहिजे. चर्चांमध्ये शाहिद इनामदार यांच्या मृत्यूचा संबंध या घटनेतून निर्माण झालेल्या तणावाशी जोडला जात आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.

 

HGMAT शी संबंधित सदस्याने शाहिद इनामदार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. “आम्ही कोणतेही आरोप करत नाही. कारण दुसऱ्या बाजूला असले तरी ते HGMAE ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य होते,” असे त्यांनी सांगितले. “प्रकरण आता पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत आहे. आम्ही कायदेशीर मार्गाने सामोरे जाऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

Local ad 1