पुणे, नसरापुर चिमुरडीवरील अत्याचारप्रकरण उघडकीस आल्यानंतर भोर तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांना हा प्रकार समजल्यानंतर तीव्र संतापाची लाट उसळली आणि अचानक शेकडो ग्रामस्थ एकत्र झाले. त्यांनी थेट पुणे-सातारा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तसेच, आरोपीला फाशी द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या असे म्हणत घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांना याप्रकरणात विशेष पथकाची स्थापना व खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. (nasrapur atrocity case protest pune satara highway bhor)
पुण्यातील रहिवशी असलेली चिमुरडी आजीकडे नसरापूर येथे सुट्टीसाठी आली होती. पण, खेळताना ती बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईक व नागरिकांनी शोध घेतला. पण, ती सापडत नसतानाच पोलिसांना दुपारी सव्वा पाचच्या सुमारास याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील खासगी सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. दरम्यान, याघटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि भोर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामस्थ अचानक एकत्र जमा झाले तीव्र संतापाची लाट पसरली. आणि ग्रामस्थ पुणे-सातारा महामार्गावर जमा झाले. त्यांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरू केले. जवळपास दोन ते अडीच तास रस्ता अडवून धरल्यानंतर महामार्ग जाम झाला होता. घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोपीला फाशी द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आंदोलकांशी संवाद साधला. त्यांना शांत केले. अत्याचारप्रकरणात विशेष पथकाची नेमणूक तसेच खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता खुला केला. दरम्यान, शनिवारी देखील ग्रामस्थ तसेच भोरमधील नागरिकांनी मुक आंदोलन केले. आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. याघटनेमुळे मात्र, सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, तीव्र संताप देखील पसरला आहे.
गुन्हा अत्यंत गंभीर असून, आरोपीवर पोक्सो आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिस दल कटीबद्ध आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (पीएनएस) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा बालकांचे अंतर्गत अत्यंत कडक कलमे लावण्यात आली आहेत. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आणि गुन्हा क्रूर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे, असे पोलिसांच्यावतेने सांगण्यात आले.
लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. भैरवनाथ मंदिर ते चेलाडी चौक दरम्यान मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. पीडितेला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा स्थानिक रहिवाशांनी घेतला आहे.

