पुणे : पुणे महानगरपालिकाचा २०६-२७ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अंदाजपत्रकाची तयारी सुरू झाली असून, या प्रक्रियेत पुणेकरांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेकडून ‘माझे पुणे, माझे बजेट’ हा विशेष नागरिक सहभाग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या परिसरातील आवश्यक विकासकामांच्या सूचना महापालिका प्रशासनाकडे नोंदवाव्यात, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे. (maaze pune maaze budget pmc citizen participation)
पुण्याच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला. ‘नागरिकांच्या सहभागातून शहराची प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात पुणेकरांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, उद्याने, सार्वजनिक सुविधा तसेच इतर विकासकामांबाबतच्या गरजा आणि सूचना महापालिकेला कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या महापालिकेकडून आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू असून, त्यामध्ये पुणेकरांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमांचे प्रतिबिंब उमटावे, यासाठी हा नागरिक सहभाग उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील आवश्यक विकासकामांबाबत सूचना देऊन शहराच्या नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सूचना नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच समाजमाध्यमांवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना अर्ज भरता येणार आहे. या माध्यमातून आपल्या परिसरातील आवश्यक विकासकामांची माहिती थेट महापालिका प्रशासनापर्यंत पोहोचवता येणार आहे. हा उपक्रम महापालिकेच्या अधिकृत नागरिक सहभाग व्यासपीठ PMC Care च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शहरातील सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन पुण्याच्या विकास प्रक्रियेला हातभार लावावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

