मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाची कारवाई
पुणे : मुळशीचे तहसिलदार रणजित भोसले यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील जमीन बदलाच्या एका प्रकरणात उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याविरुद्ध दिलेल्या आदेशानंतर शासनाने ही कारवाई केली आहे. (mulshi tehsildar ranjit bhosale suspended)
मिळालेल्या माहितीनुसार, रणजित भोसले यांनी मुळशी तहसिलदार पदावर कार्यरत असताना त्यांनी “दि टाटा पॉवर कंपनी लि.” या कंपनीच्या नावावरून जमीन हस्तांतरणात अनियमितता केली होती. त्यांनी धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव दाखल करून मालकी हक्कात बदल केला होता. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने दि. 20 मार्च 2025 रोजी दिलेल्या आदेशात हे आदेश रद्द केले.
यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, यांनी प्रकरणाची चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला होता. या अहवालातही अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणात 85 वर्षांहून अधिक जुने दस्तऐवज विचारात घेऊन निर्णय देण्यात आल्याने ती प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या चुकीची ठरली आहे.
उल्लंघन केल्याचा ठपका
या प्रकारामुळे शासकीय सेवकाच्या आचारसंहितेचा भंग झाला असून, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केल्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, 1979 मधील तरतुदीनुसार रणजित भोसले यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शासनाने या आदेशानुसार त्यांना तात्काळ निलंबित केले असून, निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे असेल. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता कामा नये.
निलंबनाच्या कालावधीत त्यांना नियमानुसार निलंबन निर्वाह भत्ता देण्यात येईल. मात्र, त्यांनी खाजगी नोकरी, धंदा वा व्यापार केल्यास हा भत्ता रद्द करण्यात येईल व पुढील कारवाई केली जाईल. दरवेळी त्यांना प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.