पुणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियान राबविण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे स्वच्छता अभियान रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या संदर्भात माहिती देताना विश्वस्त – श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. भाविकांना स्वच्छ, आरोग्यदायी, सुरक्षित आणि भक्तीमय वातावरणात दर्शन घेता यावे, हा या स्वच्छता अभियानामागील मुख्य उद्देश आहे.
मंदिर परिसरातील रस्ते, प्रवेशद्वार, सभामंडप, पार्किंग परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे. या अभियानात स्थानिक नागरिक, शिवभक्त, स्वयंसेवक आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.सामूहिक सहभागातून मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पवित्र करण्याचा संकल्प या उपक्रमातून साकार होणार असून, महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम भाविकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

