स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला व बालकांची आरोग्य तपासणी
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान पुणे जिल्ह्यात होणार ३,७३३ विशेष आरोग्य शिबिरे
पुणे, दि. १३ : संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यात महिलां व बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक महिला व बालकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे. ( Swasth Nari Sashakt Parivar Abhiyan Pune)
भारत-पाक सामना ; माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले सामना का होतोय…
या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमार्फत विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. यामध्ये महिलांसाठी उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, अॅनिमिया व सिकल सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, लसीकरण, मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन तसेच आरोग्यदायी आहार पद्धतीची माहिती दिली जाईल. तसेच रक्तदान शिबिरे, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्ड वितरण व निक्षे मित्र स्वयंसेवी नोंदणी ही करण्यात येणार आहे.
MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव
या शिबिरांसाठी स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसिक आरोग्य तज्ञ आणि कर्करोग तज्ञ यांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२४ शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्रांवर, ३,३२४ शिबिरे उपकेंद्रांवर आणि ८५ शिबिरे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये आयोजित करण्यात येतील. अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी बारामती येथील स्त्री रुग्णालयात खासदार सुनीत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर तालुका स्तरावर खासदार आणि आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.
Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा कार्यकर्त्या, स्वयंसेवक तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स, प्रसूती व स्त्रीरोग संस्था व रोटरी क्लब यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले की, या अभियानामुळे जिल्ह्यातील महिला व बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यास मोठी मदत होईल.