पुणे : नांदेड येथील गुरू गोविंद सिंहजी विमानतळ येथील धावपट्टीवरील देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर पुणे–नांदेड विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून थांबलेली हवाई वाहतूक पूर्ववत झाली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (pune nanded flight service restarted)
मोठा निर्णय! आता ‘एनए’ परवानगीची गरज नाही; थेट बांधकाम नकाशाच ठरणार मंजुरी
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) सूचनेनुसार सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळासाठी विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. धावपट्टीवर आढळलेल्या तांत्रिक त्रुटींची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर आता विमानतळ पूर्णपणे कार्यरत झाले आहे.
Star Air कडून पुणे–नांदेड मार्गावर उडान योजनेंतर्गत नियमित प्रवासी सेवा दिली जाते. दुरुस्तीच्या काळात पुण्यासह दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबाद या मार्गांवरील उड्डाणे तात्पुरती बंद होती. आता सर्व उड्डाणे पूर्ववत सुरू झाली आहेत. नांदेड विमानतळ लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि निजामाबाद या शहरांच्या जवळ असल्याने या भागातील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरते. विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने उद्योग, व्यवसाय, शिक्षण व धार्मिक पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सोय झाली आहे.

