पुण्यात जाहिरात फलकांसाठी बेकायदा वीजजोड ; महापालिकेच्या तपासणीत फक्त ८७ प्रकरणे उघड
इनामदार चौकातील अपघातानंतर उघड झाली वस्तुस्थिती
पुणे : शहरातील जाहिरात फलक, राजकीय कार्यालये आणि स्मारकांसाठी महापालिकेच्या पथदिव्यांच्या खांबांमधून सर्रासपणे बेकायदा वीज जोडणी घेतली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने अलीकडे केलेल्या तपासणीत केवळ ८७ ठिकाणीच वीज चोरी होत असल्याचे समोर आले. मात्र, या प्रकरणी एकाही व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, ही बाब विशेष लक्षवेधी ठरते. (pune illegal electricity hoarding case)
रस्त्यावरील माईलस्टोन चे रंग काय सांगतात? – जाणून घ्या रस्त्यांच्या प्रकारांची ओळख
इनामदार चौकातील अपघातानंतर उघड झाली वस्तुस्थिती
दोन आठवड्यांपूर्वी नाना पेठेतील इनामदार चौकात लावण्यात आलेल्या फलकाला हात लागल्यामुळे एका लहान मुलीचा वीज लागून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात अनधिकृत वीजजोड घेतल्याचे समोर आले असून, शिवम आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तपासणी
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत विद्युत विभागाने ही तपासणी मोहीम राबवली. त्यामध्ये नगर रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरूड-बावधन व वारजे-कर्वेनगर या भागांमध्ये १० पेक्षा अधिक बेकायदा वीजजोडीचे प्रकार आढळून आले. इतर विभागांमध्ये हे प्रमाण कमी आहे.
गुन्हा दाखल का नाही?
महापालिकेच्या विद्युत विभागाने बेकायदा वीजजोड काढून टाकल्या असल्या तरी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही, अशी कबुली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे प्रशासन बेकायदा वीज वापरणाऱ्यांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे.
“वीजजोडी तोडण्यात आली असून संबंधितांना इशारा देण्यात आला आहे. पुन्हा असे प्रकार आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल.”
– मनिषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग