...

Pmc Election 2026 : पुणे शहर सर्वोत्तम बनवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

Pmc Election 2026 : पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा विचारांवर आणि जनतेच्या सेवेसाठी काम करणारा पक्ष आहे. निवडणूक असो वा नसो, वर्षाचे बारा महिने आणि चोवीस तास काम करणारा भाजपचा कार्यकर्ता असतो. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट झाली असून त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारही मिळत नाहीत. त्यामुळे त्यांनी बाहेरून उमेदवार आयात केले आहेत. पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवायचे असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. आम्हाला केवळ सत्ता नको, तर जनतेची सेवा करायची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री व पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केले.

 

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या वतीने सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड आणि सपना आनंद छाजेड हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन करण्यात आला. या प्रसंगी मुरलीधर मोहोळ बोलत होते. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह भाजप व आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत भाजपने केलेल्या कामांमुळे शहराला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मागील सहा वर्षांतील काम, केंद्रातील मोदी सरकारचे कार्य आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजना पाहिल्या तर आज घरोघरी सरकारी योजनांचे लाभार्थी दिसतात. भाजपला केवळ सत्ता नाही, तर जनसेवा महत्त्वाची आहे.

 

यावेळी उमेदवार सनी विनायक निम्हण म्हणाले, स्वर्गीय माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आणि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांची काम करण्याची धमक या वारशातून आम्ही चारही उमेदवार प्रभागाचा समतोल व सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. अन्न, वस्त्र, निवारा यांसोबतच शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा असून, बोपोडी परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या असलेल्या महापालिकेच्या दोन दवाखान्यांचे अद्ययावतीकरण करून ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ई-लर्निंग स्कूल सुरू करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन विकास करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

 

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, राज्यात आणि देशात आज ‘डबल इंजिन सरकार’ कार्यरत आहे. पुणे शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी महापालिकेतही भाजपला बहुमत द्या. त्यामुळे पुणे शहरात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ स्थापन होऊन शहर विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर जाईल.

 

 

 

Local ad 1