शिष्यवृत्ती प्रक्रियेत मोठा बदल ; दिव्यांग विद्यार्थ्यांना थेट DBT मार्फत होणार लाभ, परंतु…
पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Pre-Matric Scholarship) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण विभागाने शालान्तपूर्व शिष्यवृत्ती थेट विद्यार्थी आणि पालक यांच्या आधार संलग्न संयुक्त बँक (Joint Bank Account Scholarship) खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती स्पष्ट ; काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ
दिव्यांग कल्याण विभागाने यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. राज्य शासनाच्या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये कोणताही विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शिष्यवृत्ती योजनांमध्ये आधारसंलग्न माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शालान्तपूर्व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आता पालकांसोबतचे आधारसंलग्न संयुक्त बँक खाते अनिवार्य आहे. अर्ज व संपूर्ण प्रक्रिया महाडीबीटी संकेतस्थळावरूनच पार पाडली जाणार आहे. (Disability Welfare Department India)
अर्ज आणि प्रक्रिया
शालान्तपूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) संकेतस्थळावरून अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्जापासून ते शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईपर्यंतची सर्व प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरच केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी पालकांसह संयुक्त बँक खाते, आधार क्रमांक आणि यूडीआयडी (Unique Disability ID – UDID) या माहितीचा तपशील भरणे आवश्यक आहे.
संयुक्त बँक खाते अनिवार्य
या योजनेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये खाते उघडण्याचे निर्देश दिले आहेत. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात जमा होईल.
जबाबदारी आणि अंमलबजावणी
योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जबाबदार असतील.अर्ज तपासणी, पात्रतेची खातरजमा आणि मंजुरीची प्रक्रिया नियमानुसार केली जाईल. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्त समन्वय आणि आहरण संवितरण अधिकारी म्हणून काम करतील.
माहितीची सुरक्षितता
योजनेअंतर्गत आधार संलग्न बँक खात्यावर लाभ हस्तांतरण करताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती गुप्त ठेवली जाणार आहे. अशी माहिती ऑनलाइन प्रणालीव्यतिरिक्त कोणालाही उपलब्ध होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
पात्रतेचे निकष कायम
शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. फक्त लाभाचे वितरण अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी ही सुधारित प्रक्रिया राबवली जाणार आहे.