“सीसीएमपी डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी? आयएमएचा तीव्र विरोध”
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ठरवणार उपचारांची कक्षा
पुणे : ‘आधुनिक चिकित्सा औषधशास्त्र अभ्यासक्रम’ (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत (एमएमसी) करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे महाधिवक्ता यांचा सकारात्मक अभिप्राय आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली असून एमएमसीमध्ये स्वतंत्र नोंदवही ठेवली जाणार आहे.
भारत-पाक सामना ; माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले सामना का होतोय…
सीसीएमपी धारक डॉक्टरांना एमबीबीएस डॉक्टरांप्रमाणे सरसकट प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळणार नसून त्यावर काही मर्यादा असतील, असे एमएमसीचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी स्पष्ट केले. अभ्यासक्रमात शिकवलेल्या विषयांपुरतीच त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी असेल. या अभ्यासक्रमात फार्माकोलॉजी, औषधांचे दुष्परिणाम, डोस, आपत्कालीन उपचार, संसर्गजन्य रोग आणि प्राथमिक आरोग्यसेवा यांचा समावेश आहे.
MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेने या नोंदणीला जोरदार विरोध दर्शवला आहे. “२०१४ मध्ये न्यायालयानेच होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषध लिहून देण्याचा वैधानिक अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ सहा महिन्यांच्या सीसीएमपी अभ्यासक्रमानंतर अलोपॅथी औषधे देणे हे जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे,” असे आयएमएचे राज्य सचिव डॉ. संतोष कदम यांनी सांगितले.
Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सर्वसामान्यांना आवश्यक असणारे ॲलोपॅथी उपचार आम्ही करू शकतो. मात्र, गर्भपात किंवा शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार आम्हालाही नाही. अशा शस्त्रक्रिया एमबीबीएस डॉक्टरांनाही मर्यादित प्रमाणातच करता येतात. त्यामुळे आमच्या अभ्यासक्रमात नमूद केल्याप्रमाणे आम्ही मर्यादित उपचारच करू.” या प्रकरणाचा अंतिम निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अभ्यासक्रमाच्या चौकटीत राहून घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.