Nana Patekar funeral : नानाची वाडीत शासकीय इतमामात नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन; डोणजेतील फार्महाऊसवर अंत्यसंस्कार

 

Nana Patekar funeral : पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी रात्री डोणजे येथील त्यांच्या ‘नानाची वाडी’ फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. रात्री 11 वाजून 28 मिनिटांनी मुलगा मल्हार पाटेकर यांनी मुखाग्नी दिली. शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

नाना पाटेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, खासदार सुनील तटकरे, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, अमित गोरखे, हेमंत पाटील तसेच महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Nana Patekar Passes Away : ‘नटसम्राट’ नाना पाटेकर हरपले; 75व्या वर्षी गोव्यात निधन

 

 

नाना यांचे पार्थिव नागरिकांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच ‘नानाची वाडी’कडे चाहते आणि स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती. चित्रपटसृष्टी, मराठी रंगभूमी, सामाजिक क्षेत्र तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अंतिम दर्शनावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.

 

डोणजे आणि परिसराशी नाना पाटेकर यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. ‘नानाची वाडी’ हे त्यांच्यासाठी केवळ फार्महाऊस नव्हते, तर त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींशी जोडलेले ठिकाण होते. स्थानिक नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या साधेपणाच्या आणि आपुलकीच्या आठवणींना उजाळा दिला. शासकीय मानवंदना दिल्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नानांचे पार्थिव पंचतत्त्वात विलीन झाले; मात्र त्यांची अभिनयकला, सामाजिक बांधिलकी आणि रसिकांशी असलेले आत्मीय नाते कायम स्मरणात राहणार आहे.

 

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळावर वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ‘नाना माझे स्नेही, मित्र आणि मार्गदर्शक होते,’ अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. राज्य सरकारच्या वतीने नाना पाटेकर यांना मानवंदना देण्यात आली. फडणवीस यांनी नाना यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ‘एका हरहुन्नरी कलाकाराला अखेरचा निरोप देताना मन भरून आले,’ असे त्यांनी म्हटले.

 

 

 

 

Local ad 1