Nana Patekar Passes Away : ‘नटसम्राट’ नाना पाटेकर हरपले; 75व्या वर्षी गोव्यात निधन

Nana Patekar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले. 75 वर्षीय नाना पाटेकर यांच्या डोना पावला येथील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी दिली.

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर अर्थात नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जात होते. रंगभूमीपासून अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या नाना पाटेकर यांनी मराठी नाटकांसह हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Drishti IAS Pune Centre : दृष्टी आयएएसचे पुण्यात पहिले केंद्र; यूपीएससी इंग्रजीत, एमपीएससीसाठी मराठी वर्ग लवकरच

नायक, सहनायक, खलनायक तसेच चरित्र भूमिका अशा विविध छटांच्या भूमिका त्यांनी ताकदीने साकारल्या. गंभीर भूमिका असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा, आपल्या दमदार संवादफेकीने आणि अभिनयाच्या वेगळ्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला.

रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास

नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जडणघडण मराठी रंगभूमीवर झाली. ‘पुरुष’ या नाटकातील गुलाबराव तसेच ‘हमीदाबाईची कोठी’मधील सत्तार या भूमिका विशेष गाजल्या.

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. ‘गिद्ध’, ‘भालू’, ‘शीला’ यांसारख्या चित्रपटांतही त्यांनी काम केले. मात्र या चित्रपटांमुळे त्यांना अपेक्षित मोठी ओळख मिळाली नाही.

1986 मध्ये एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’ चित्रपटाने नाना पाटेकर यांच्या कारकीर्दीला निर्णायक वळण दिले. बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या सरळमार्गी तरुणाची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारली. त्यानंतर ‘प्रतिघात’मधील भूमिका आणि 1989 मधील ‘परिंदा’ने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता म्हणून स्थापित केले.

‘परिंदा’ने मिळवून दिली राष्ट्रीय ओळख

‘सलाम बॉम्बे!’मधील भूमिकेने नाना पाटेकरांकडे प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधले. मात्र ‘परिंदा’ हा त्यांच्या कारकीर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील अण्णा या खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

त्यानंतर ‘तिरंगा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका केल्या. ‘तिरंगा’मधील त्यांच्या संवादफेकीने नाना पाटेकर घराघरांत पोहोचले. गंभीर आणि आक्रमक भूमिका साकारताना ज्या ताकदीने ते प्रेक्षकांसमोर आले, त्याच सहजतेने त्यांनी विनोदी भूमिकाही गाजवल्या.

‘नटसम्राट’मधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

मराठी चित्रपटसृष्टीत ‘नटसम्राट’ हा नाना पाटेकर यांच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या गाजलेल्या नाटकावर आधारित या चित्रपटात त्यांनी गणपतराव बेलवलकर ही भूमिका साकारली. रंगभूमीवर ‘नटसम्राट’ म्हटले की ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची आठवण होते; मात्र रुपेरी पडद्यावर ही व्यक्तिरेखा नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केली. त्यांच्या भावपूर्ण अभिनयाने आणि संवादफेकीने या भूमिकेला नवी उंची मिळाली.

अभिनयासोबत सामाजिक बांधिलकी

नाना पाटेकर यांची ओळख केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारा कलाकार म्हणूनही होती. सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले. अभिनयातील दमदार उपस्थिती, प्रभावी आवाज, संवादफेक आणि प्रत्येक व्यक्तिरेखेला दिलेली स्वतःची छाप यामुळे नाना पाटेकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका प्रभावी आणि अष्टपैलू अभिनेत्याचा अध्याय संपला आहे.

Local ad 1