राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुके कोणते? नांदेडच्या १४ तालुक्यांचाच समावेश; संपूर्ण यादी पाहा
खरीप २०२६ : Trigger-1 अंतर्गत शासनाचा निर्णय; पीक कर्ज पुनर्गठनासह विविध सवलती लागू
मुंबई दि. 26 : राज्यातील खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील तूट आणि अन्य निकषांच्या आधारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने Trigger-1 (प्रथम कळ) निकषांच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश आहे. तर मुदखेड आणि मुखेड तालुक्याना वगळले आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत झालेल्या पावसातील तूट तसेच दुष्काळाशी संबंधित अन्य घटकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाच्या विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. (maharashtra drought 2026 265 talukas nanded-14-talukas)
नांदेडमधील १४ तालुके दुष्काळग्रस्त
नांदेड जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव या १४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश करण्यात आला आहे.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश
Trigger-1 लागू झाल्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण करण्यात आलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून त्याआधारे पिक परिस्थितीचा अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्याचे निर्देश आहेत.
शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा
कोणत्या सवलती मिळणार?
दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी शासनाने विविध सवलती आणि उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती यांचा समावेश आहे.तसेच ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यावरील क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीजबिलात सवलत देण्यात येणार आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
पाणी, चारा आणि रोजगारासाठी उपाययोजना
दुष्काळग्रस्त भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्याचे निर्देश आहेत. आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था, जलसंधारणाची कामे आणि पिण्याचे तसेच जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, तसेच जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आली आहे.
पीक नुकसानीची मदत स्वतंत्र निर्णयाने
दरम्यान, दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी मिळणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पंचनामे आणि पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मदतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
२६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांची जिल्हावार यादी
रायगड जिल्हा: श्रीवर्धन (१ तालुका) रत्नागिरी जिल्हा: रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर (३ तालुके) सिंधुदुर्ग जिल्हा: सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला (८ तालुके) नाशिक जिल्हा: मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा (१० तालुके) धुळे जिल्हा: धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर (४ तालुके) जळगाव जिल्हा: एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल (१५ तालुके) नंदुरबार जिल्हा: अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी (६ तालुके) अहिल्यानगर जिल्हा: नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता (१४ तालुके) पुणे जिल्हा: भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर (८ तालुके) सोलापूर जिल्हा: उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा (११ तालुके) सांगली जिल्हा: मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ (४ तालुके) सातारा जिल्हा: सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर (६ तालुके) कोल्हापूर जिल्हा: पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड (६ तालुके) छत्रपती संभाजीनगर जिल्हा: छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री (९ तालुके) जालना जिल्हा: बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद (८ तालुके) बीड जिल्हा: बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी (११ तालुके) लातूर जिल्हा: लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट (१० तालुके) धाराशिव जिल्हा: धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा (८ तालुके) नांदेड जिल्हा: नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहोर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव (१४ तालुके) परभणी जिल्हा: पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी (९ तालुके) हिंगोली जिल्हा: हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत (५ तालुके) बुलढाणा जिल्हा: जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा (१३ तालुके) अमरावती जिल्हा: अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर (१४ तालुके) अकोला जिल्हा: अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी (७ तालुके) वाशिम जिल्हा: वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा (६ तालुके) यवतमाळ जिल्हा: यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव (१६ तालुके) वर्धा जिल्हा: वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी (७ तालुके) नागपूर जिल्हा: नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर (१४ तालुके) भंडारा जिल्हा: भंडारा, पवनी, लाखंदूर (३ तालुके) गोंदिया जिल्हा: तिरोडा (१ तालुका) चंद्रपूर जिल्हा: चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा (१२ तालुके) गडचिरोली जिल्हा: गडचिरोली, चार्मोर्शी (२ तालुके)

