दादा… तुमची उणीव जाणवते ! अजितदादांच्या आठवणींना रोहन सुरवसे पाटील यांची भावनिक शब्दांजली

 

२२ जुलै… हा दिवस अजित दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा असायचा. कार्यकर्त्यांच्या गराड्यात, चेहऱ्यावरचे ते प्रसन्न हास्य, प्रत्येकाला आपुलकीने भेटण्याची त्यांची सवय आणि “काम करत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे,” हा त्यांचा दिलासा आजही कानात घुमतो. पण नियतीने असा क्रूर खेळ केला की, आता हा दिवस वाढदिवसाचा राहिला नाही; तो त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या जयंतीचा दिवस बनला आहे. २२ जुलैला त्यांच्या आठवणी मनाला अधिकच अस्वस्थ करून जातात.

 

माझा दादांसोबतचा सहवास फार मोठा नव्हता, पण त्या अल्प काळात त्यांनी मला दिलेला आत्मविश्वास, माया आणि मार्गदर्शन आयुष्यभर पुरेल इतके आहे. मी युवक काँग्रेसमध्ये राज्यस्तरीय पदाधिकारी म्हणून काम करत असताना माझ्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची त्यांनी दखल घेतली. “माझ्यासोबत काम कर,” असा त्यांचा निरोप आला, तो माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षा कमी नव्हता. क्षणाचाही विलंब न करता मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. आजही तो क्षण आठवला की मन अभिमानाने भरून येते.

 

बालेवाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची भेट घेतली.. त्यानंतर शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश दिला. त्या दिवशी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवत म्हटलेले शब्द आजही माझ्यासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत – चांगलं काम कर… मी कायम तुझ्या पाठीशी आहे.” नेतृत्वाकडून मिळालेला हा विश्वास माझ्यासाठी मोठी ताकद ठरला. त्या एका वाक्याने सार्वजनिक

दादांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा. त्यांच्या दालनात कोणतेही काम घेऊन गेल्यानंतर ते शक्य असेल तर तात्काळ “हो” म्हणायचे आणि शक्य नसेल तर तेवढ्याच स्पष्ट शब्दांत “यात वेळ घालवू नकोस” असे सांगायचे. खोटी आश्वासने देऊन कार्यकर्त्यांना फिरवत ठेवणे त्यांना कधीच मान्य नव्हते. त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणा आणि प्रत्येक निर्णयामध्ये पारदर्शकता दिसून यायची. म्हणूनच कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी केवळ आदर नव्हता, तर अढळ विश्वास होता.

 

दादा हे केवळ राजकीय नेते नव्हते; ते कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, त्यांची अडचण समजून घेणारे आणि योग्य वेळी खंबीरपणे साथ देणारे नेतृत्व होते. त्यांनी कधीही पदाचा गर्व केला नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेसे करण्याची त्यांची शैलीच वेगळी होती. त्यामुळे त्यांच्याशी झालेली प्रत्येक भेट ही काहीतरी नवीन शिकवून जाणारी ठरायची.

 

आजही अनेकदा मनात एकच विचार येतो… जर दादांचा सहवास आणखी काही काळ लाभला असता, तर सार्वजनिक जीवनातील अनेक गोष्टी त्यांच्या अनुभवातून शिकता आल्या असत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक काम करण्याची संधी मिळाली असती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बारामतीजवळ झालेल्या त्या दुर्दैवी विमान अपघाताने केवळ एका कर्तृत्ववान नेत्यालाच आपल्यापासून हिरावून नेले नाही, तर हजारो कार्यकर्त्यांचा आधारवडही हरपला. त्या घटनेने प्रत्येकाच्या मनात अशी पोकळी निर्माण केली, जी आजही भरून निघालेली नाही.

 

आज त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त मनात अनेक आठवणी दाटून येत आहेत. हा दिवस साजरा करण्यापेक्षा त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेली प्रेरणा जपण्याचा दिवस आहे. त्यांनी दिलेला विश्वास, त्यांचे प्रेम, त्यांची कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांबद्दलची आत्मीयता माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील.

 

दादा, तुम्ही आज शरीराने आमच्यात नसाल; पण तुमचे विचार, तुमची शिकवण, तुमची माणुसकी आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास माझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहे. तुमची उणीव कोणतीही व्यक्ती भरून काढू शकणार नाही. प्रत्येक २२ जुलैला तुमची आठवण अधिकच तीव्र होते आणि मन नकळत भरून येते.

 

दादा, तुम्हाला विनम्र अभिवादन! तुमच्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.

 

– रोहन सुरवसे पाटील, नेते राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे

Local ad 1