महापौर बंगल्यात २१ झाडांची कत्तल ; आयुक्त नवल किशोर राम यांचा कडक पवित्रा, दोषींवर कारवाईचे संकेत
छाटणीच्या नावाखाली झाडांची निर्घृण कत्तल; उद्यान, भवन आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून खुलासा मागवला
पुणे : महापौर बंगल्यात छाटणीच्या नावाखाली तब्बल २१ झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणात उद्यान विभाग, भवन विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून सविस्तर खुलासा मागवण्यात आला असून अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. (mayor bungalow tree cutting pune action on officials)
पुण्यात भाजपच्या विजयामागचं ‘गुपित’ काय? खासदार संजय राऊतांनी केलं उघड !
शहरातील धोकादायक झाडे किंवा फांद्या छाटण्यासाठी परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीकडे असते. यासाठी संबंधित नागरिकाने झाडांचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक असते. त्यानंतर समिती पाहणी करून आवश्यक परवानगी देते.
मात्र, महापौर बंगल्यातील निलगिरी, पिंपळ, जांभूळ, आंबा, उंबर आणि लिंबाची अशी २१ झाडे ‘अस्ताव्यस्त वाढली असून संभाव्य धोका निर्माण करत आहेत’ या कारणावरून फांद्या छाटण्याचा प्रस्ताव शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.
यानंतर वृक्ष संवर्धन विभागाने कारवाई करताना फक्त फांद्या छाटण्याऐवजी अनेक झाडे दहा फुटांपर्यंत कापल्याचे, तर काही झाडे थेट बुंध्यापासून तोडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘छाटणी’च्या नावाखाली प्रत्यक्षात झाडांची कत्तलच झाल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणात माहिती देताना संबंधित विभागांकडून विसंगत आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेत नेमकी चूक कुठे झाली, मंजुरी कशी मिळाली आणि चुकीची माहिती का देण्यात आली, याचा आता शोध घेतला जात आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर Ram यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उद्यान विभाग, क्षेत्रीय कार्यालय आणि भवन विभागाकडून या प्रकरणाचा खुलासा मागवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

