...

मराठी संशोधकाचा जागतिक पराक्रम ; ‘कोलंबियात विकसित स्टार’ प्रणालीमुळे निपुत्रिक दांपत्याला मिळाली गोड बातमी

अ‍ॅझोस्पर्मिया रुग्णांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जगातील एकमेव तंत्रज्ञान

पुणे : अपत्य न होण्याची समस्या ही जगभरातील असंख्य जोडप्यांसाठी अतिशय वेदनादायी ठरते. त्यातही पुरुषांमधील अ‍ॅझोस्पर्मिया म्हणजे वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या जवळजवळ शून्य असण्याची स्थिती, ही नैसर्गिक गर्भधारणेला पूर्णविराम देणारी समस्या मानली जाते. अशा रुग्णांसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात (Columbia University, USA) ‘स्टार’ (Sperm Tracking and Recovery) ही क्रांतिकारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

 

 

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

 

ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) साहाय्याने वीर्यातील लपलेले शुक्राणू शोधून त्यांना ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’ (IVF) प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देते. यामुळे पूर्वी अपत्य होणे अशक्य मानल्या जाणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांना स्वतःचं बाळ होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या प्रणालीच्या विकासामागे मराठी संशोधक डॉ. हेमंत सूर्यवंशी यांचे नेतृत्व आहे. लातूरचे रहिवासी असलेले डॉ. सूर्यवंशी सध्या कोलंबिया विद्यापीठाच्या पुनरुत्पादन शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

 

भारत-पाक सामना ; माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले सामना का होतोय…

 

 

अ‍ॅझोस्पर्मियाची समस्या काय?

सामान्यतः एका वेळच्या वीर्यस्खलनात गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले १० ते २० कोटी शुक्राणू असतात. मात्र, अ‍ॅझोस्पर्मिया असलेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंचं प्रमाण नगण्य किंवा शून्य असतं. त्यामुळे अशा रुग्णांना नैसर्गिक गर्भधारणा अशक्य ठरते. आतापर्यंतच्या उपचार पद्धतींमध्ये मुख्य पर्याय म्हणजे, अंडकोशातील शस्त्रक्रियेद्वारे (Testicular Surgery) शुक्राणू काढणे किंवा दात्याचे शुक्राणू वापरणे. पण या पद्धतींमध्ये जैविक पित्याचे अपत्य होण्याची शक्यता कमीच असे.

 

‘स्टार’ प्रणाली कशी कार्य करते?

‘स्टार’ मध्ये प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम, मायक्रोफ्लुइडिक चिप आणि हाय-स्पीड कॅमेऱ्यांचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान सूक्ष्मदर्शक पातळीवर वीर्यातील भाग स्कॅन करते. शुक्राणू असलेल्या पेशींचे अचूक ठिकाण ओळखते. त्यांना लहान थेंबांमध्ये वेगळं करून IVF साठी उपलब्ध करून देते. संपूर्ण प्रक्रिया रसायनमुक्त, सुरक्षित आणि नैसर्गिक असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

 

एका जोडप्याने तब्बल १९ वर्षे गर्भधारणा करण्याचे प्रयत्न केले होते. पतीमध्ये अ‍ॅझोस्पर्मिया असल्याने IVF च्या अनेक सायकल करूनही यश मिळाले नव्हते. मात्र ‘स्टार’ प्रणालीद्वारे मिळालेल्या फक्त ५ शुक्राणूंमधून एक यशस्वी ठरला आणि पत्नी सध्या पाच महिन्यांची गर्भवती आहे. आणखी एका नमुन्यात, तज्ज्ञांनी दोन दिवस तपासूनही एकही शुक्राणू सापडला नव्हता. पण ‘स्टार’ ने त्याच नमुन्यातून तब्बल ४४ शुक्राणू शोधून काढले. यामुळे पूर्वी निराश झालेल्या अनेक रुग्णांना नवी संधी मिळाली आहे.

भारतातही लवकरच उपलब्ध

सध्या ‘स्टार’ प्रणाली केवळ कोलंबिया विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत उपलब्ध आहे. मात्र, भारतात येत्या सहा महिन्यांत दिल्ली किंवा मुंबईत हे तंत्रज्ञान सुरू करण्याची योजना आहे.जगभरातून, विशेषतः भारत, युरोप आणि अमेरिकेतून जवळपास २०० जोडप्यांनी या पद्धतीद्वारे गर्भधारणेसाठी नोंदणी केली आहे.

 

“गर्भधारणेसाठी प्रत्यक्षात अगदी दोन ते चार शुक्राणू पुरेसे ठरतात. ‘स्टार’ तंत्रज्ञानामुळे अनेकांना स्वतःचं अपत्य होण्याची संधी मिळणार आहे. भारतात लवकरच हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची आमची योजना आहे.
– डॉ. हेमंत सूर्यवंशी, सहाय्यक प्राध्यापक, पुनरुत्पादन शास्त्र विभाग, कोलंबिया विद्यापीठ, युएसए.

 

Local ad 1