कोठडीतील मृत्यूप्रकरणी मोठा निर्णय : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, सर्वात मोठा विजय : ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या उच्चशिक्षित कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, “कोठडीतील मृत्यू प्रकरणात न्यायालयाचा हा निर्णय हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. प्रशासन ‘हार्ट अटॅक’ असल्याचा कांगावा करत होते, परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार.”पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. आंबेडकर यांनी सांगितले की, पीडित कुटुंबाच्या वतीने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.