Sad News : Congress MP Balu Dhanorkar Passes Away। चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Sad News : Congress MP Balu Dhanorkar Passes Away : चंद्रपुरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्लीत उपचारादरम्यान निधन झाले. पित्ताशय (Gallbladder) आणि स्वादुपिंड मध्ये (Pancreas) इन्फेक्शन झाल्याने धानोरकर यांना नागपूर इथून एअर अँम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धानोरकर यांचं पार्थिव सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने चंद्रपुरा येथे आणण्यात येईल. तर उद्या त्यांच्यावर वाजता वरोरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी ही माहिती दिली.

 

 

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले आहे. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते.

 

बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य माणूस ते आमदार आणि खासदार होण्याचा प्रवास प्रेरणादायी होता., अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात  यांनी व्यक्त केली आहे.

 

पृथ्वीराज चव्हाण : सकाळीच बाळू धानोरकर यांच्या निधनाची बातमी आली आणि धक्का बसला. त्यांचा फार वय नव्हतं. हा काँग्रेस आणि महाराष्ट्राकरता मोठा धक्का आहे. 2019 च्या अत्यंत संघर्षमय आणि अटीतटीच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दु:खाची छाया पसरली आहे.

 

अशोक चव्हाण  :  काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे. खा. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत.

 

 

अजित पवार : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

 

Local ad 1