पुणे : बोपोडी परिसराचा विकास केवळ स्मार्ट पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता, नागरिकांच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीपर्यंत विस्तारित केला जाईल, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी दिली. बोपोडी परिसरात आयोजित पदयात्रेच्या समारोपावेळी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निम्हण म्हणाले की, बोपोडी मध्ये सुसज्ज अंतर्गत रस्ते, रुंद पदपथ, उद्याने, क्रीडांगणे आणि स्मार्ट सिटीसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जातील. यासोबतच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा, स्वच्छ हवा, सुरक्षित व शुद्ध पाणी तसेच कचऱ्याचे शास्त्रीय नियोजन उपलब्ध करून दिले जाईल. “आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित वातावरण हेच खऱ्या अर्थाने शाश्वत नगरविकासाचा पाया आहे,” असे त्यांनी सांगितले.
“माझे राजकारण विभाजनाचे नाही, तर विश्वास आणि विकासाचे आहे. कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांचे संस्कार माझ्यावर आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दिलेली प्रत्येक ग्वाही पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो,” असेही ते म्हणाले.
बोपोडीच्या विकासासाठी १०० दिवसांचा कालबद्ध कृती आराखड राबवण्यात येणार असून, त्याची प्रगती नियमितपणे नागरिकांसमोर मांडली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

