...

नांदेडमध्ये ‘बसवेश्वर अध्यासन केंद्र’ लवकरच ; खासदार डाॅ. अजित गोपछडे

 

पुणे : महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने नांदेड येथे लवकरच अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केली. सोलापूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यापीठ येथे सुरू असलेल्या केंद्राच्या धर्तीवर नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे पुढील एका महिन्यात हे केंद्र कार्यान्वित होणार असल्याचे खासदार डाॅ. गोपछडे यांनी सांगितले. (basaveshwar adhyasan kendra nanded ajit gopchade announcement)

 

महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेनेचे आत्मचिंतन; संघटन मजबूत करण्यावर भर

 

वीरशैव लिंगायत संघाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा पुण्याती डेक्कन हर्डीकर रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ. त्र्यंबक दापकेकर होते. यावेळी माजी मंत्री डॉ. विनय कोरे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, भोकरचे नगराध्यक्ष भगवान दंडवे, सूर्यकांत विश्वासराव आदी उपस्थित होते.

 

प्रास्ताविक संजय कोडगे यांनी केले, पक्षभेद बाजूला ठेवून समाजहितासाठी काम करण्याचे आवाहन केले. लिंगायत समाजासाठीच्या आर्थिक विकास महामंडळासाठी अपुरी निधी तरतूद असल्याचे सांगत ती वाढवण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अनेक गावांमध्ये लिंगायत समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

 

कार्यक्रमात मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

 

डॉ. गोपछडे म्हणाले की, खासदार झाल्यानंतर अहमदपूर ते मंगळवेढा असा दौरा करून समाजाच्या विविध प्रश्न समजुन घेतले. लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.नवी मुंबई येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली असून पिंपरी-चिंचवडमध्येही जागा शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातही वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

 

राज्यसभेत महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने ‘संसदरत्न’सारखा पुरस्कार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केली असली, तरी समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ती अपुरी असल्याचे सांगत किमान १००० कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी डॉ. विनय कोरे यांनी लिंगायत समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटींमुळे समाजाला अपेक्षित लाभ मिळत नसल्याने त्या शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या जनगणनेत ‘हिंदू लिंगायत’ अशी स्वतंत्र नोंद व्हावी, यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

 

 

Local ad 1