दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महावितरण ‘हायअलर्ट’वर; कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास शिस्तभंगाची कारवाई

 

मुंबई, १ ऑक्टोबर २०२६ : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणा हाय अलर्ट वर ठेवली आहे. शेतीपंप यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी अभियंते, यंत्रचालक आणि तारमार्ग कर्मचाऱ्यांना आपापले मुख्यालय न सोडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. (mahavitaran employees not leave headquarters drought 2026)

 

 

यंदा जूनपासून राज्यात पर्जन्यमानात मोठी तूट नोंदवण्यात आली असून, अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

 

रस्ता रुंदीकरणाच्या जागेवर बांधकाम? आधी घ्या भूसंपादन विभागाची एनओसी

 

 

मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या आदेशानुसार महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध परिमंडलांचा दौरा करून वीजपुरवठ्याशी संबंधित तांत्रिक कामांचा आढावा घेतला. यावेळी वीजयंत्रणेची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या.

 

बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती

दुष्काळी परिस्थितीत शेतीसह इतर ग्राहकांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था किंवा तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिपत्रकातून देण्यात आला आहे.

महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्यासह सर्व कार्यकारी संचालकांनी संबंधित परिमंडलांमध्ये पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

 

 

 

 

 

Local ad 1