...

नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

नांदेड : मागील २४ तासांत नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये २५ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांना नवीन पूर आला असून, अनेक ठिकाणी पाणीपुरवठा आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 

महानंदा नदीवरील बिलगडे धरणातून १६,९३६ घनमीटर पाण्याचा विसर्ग, तर सिद्धेश्वर धरणातून १,११,९९२ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत.

 

प्रशासनाचा इशारा

नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर लक्षात घेता पुढील २४ तासांत आणखी पाण्याची पातळी वाढू शकते. नदी – नाल्यांच्या काठावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलावे, असा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  1. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, वीजपुरवठा खंडित झाल्यास उपकरणे तात्काळ बंद करावीत.
  2. नदी, नाले आणि पूल ओलांडू नयेत.
  3. घरातील वीज उपकरणे, दरवाजे, खिडक्या नीट बंद ठेवाव्यात.
  4. घरात व आसपास स्वच्छता राखावी, जेणेकरून रोगराई पसरू नये.
  5. मदतीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा – दूरध्वनी क्र. (०२४६२) २५१५५५, टोल फ्री क्र. १०७७.

नागरिकांना आवाहन

पूरग्रस्तांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित स्थळी ठेवावा. जनावरांची योग्य काळजी घ्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Local ad 1