मुंबई : सोशल मीडियाचा वापर सण-उत्सवांच्या शुभेच्छा, वाढदिवस साजरे करणे, बॅनरबाजी हा नेहमीचा प्रकार झाला आहे. मात्र या रूढ पद्धतींना फाटा देत “मानवता हाच खरा धर्म” या संकल्पनेतून मुंबईतील काही तरुणांनी एक वेगळी वाट धरली आहे. नांदेडच्या भूमिपुत्रांनी स्थापन केलेला “मुंबईतील नांदेडकर” हा व्हॉट्सॲप ग्रुप आज मदतीचा हात देणारा आणि संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा दीपस्तंभ ठरत आहे. मुंबईत नोकरी निमित्ताने स्थायिक झालेल्या बाबर शेख, गोविंदराव कदम, देवा महाजन आणि विजय कामीनवार यांनी या ग्रुपची स्थापना केली. राष्ट्रप्रेम, मानवता आणि संकटात आधार हा ग्रुपचा मूलमंत्र आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी स्पष्ट केले कुणबी प्रमाणपत्र मिळणार ?
या ग्रुपमार्फत आतापर्यंत केरळ पुरग्रस्तांसाठी २५,५०१ रुपयांची मदत निधी गोळा करून सीएम रिलीफ फंडात जमा केला. शहीद जवान स्वप्नील मुस्तापूरे यांच्या कुटुंबीयांना ४८,००० आर्थिक मदत केली. चिमुकल्या रिधांशच्या कर्करोगावरील उपचारासाठी केवळ दोन दिवसांत ₹८०,००० हून अधिक रक्कम थेट त्याच्या वडिलांच्या खात्यात जमा केली.
नात्यापलीकडचे नातं
जिथे काहीजण स्वतःच्या आईवडिलांची जबाबदारी टाळतात, तिथे रक्ताचे नातेसंबंध नसतानाही या ग्रुपने शेकडो लोकांशी माणुसकीचे नातं जोडले आहे. त्यांच्या मदतीमुळे अनेक कुटुंबांना जगण्याची नवी दिशा मिळाली आहे.
तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर
डिजिटल आणि एआयच्या युगात जिथे माणसं मोबाईलच्या पडद्यावर हरवली आहेत, तिथे “मुंबईतील नांदेडकर” हा व्हॉट्सॲप ग्रुप तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत मानवतेचे बीज रोवत आहे. एकंदरीत, बॅनरबाजीऐवजी संवेदनशील कृती आणि समर्पित भावनेतून समाजात आशेचा किरण निर्माण करणारा हा ग्रुप इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतो आहे.