...

वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ फेसलेस पद्धतीने सहज उतरवता येणार

RTO कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ; प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन

पुणे, 15 जुलै 2025 :  वाहन खरेदी वेळी घेतलेल्या कर्जाच्या मुदतीनंतर वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ (Hypothecation) रद्द करण्यासाठी आता वाहनधारकांना आरटीओ कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. परिवहन विभागाने फेसलेस सेवेचा अवलंब करत ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. केंद्र सरकारच्या ‘फेसलेस सेवा’ उपक्रमाअंतर्गत ही सुविधा सुरु करण्यात आली असून अर्जदाराला घरबसल्या ही सेवा मिळणार आहे.

राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत आधार आधारित ओटीपी पडताळणीद्वारे अर्जदाराची ओळख निश्चित केली जाईल. वाहनाची माहिती आणि अर्जदाराचे नाव विभागाच्या रेकॉर्डशी जुळवल्यानंतर संबंधित बँक थेट वाहन प्रणालीवर कर्ज संपुष्टात आल्याचे प्रमाणपत्र (NOC) अपलोड करेल. यामुळे अर्जदाराला कोणतेही प्रत्यक्ष दस्तऐवज सादर करण्याची गरज उरणार नाही.

परिवहन विभागाने देशभरातील सुमारे ३५ ते ४० बँकांना ‘वाहन’ प्रणालीशी जोडले आहे. त्यामुळे या बँकांकडून कर्ज घेणाऱ्या वाहनधारकांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होणार आहे.

कशी असेल फेसलेस प्रक्रिया?

आधारद्वारे ऑनलाईन पडताळणी
नमुना क्रमांक ३५ व आवश्यक कागदपत्रांच्या डिजिटल अपलोड
बँकेकडून वाहन प्रणालीवर थेट माहितीची देवाणघेवाण
कर्ज संपल्याचे बँकेमार्फत थेट अपडेट

फेसलेस सुविधेचे फायदे

आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही
आधार आधारित ओळख पडताळणी
पारदर्शक आणि तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित प्रक्रिया
वेळ आणि कागदपत्रांची बचत

Local ad 1