PMC Election 2025 : अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर, किती बदल होणार ?
PMC Election 2025 पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील आक्षेप आणि सूचना यावर झालेल्या सुनावणीनंतर आता अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर होणार आहे. या अंतिम आराखड्यात अंदाजे १४ ते १५ बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये ६ ते ७ प्रभागांची नावे बदलण्यात आली असून ८ ते १० बदल हे प्रभागांच्या सीमांशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अंतिम प्रभाग रचना दोन दिवसांत महापालिकेकडे सुपूर्द केली जाणार असून त्यानंतर प्रभाग आरक्षण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक आणि राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या वेळी महापालिका निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहेत. त्यानुसार एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. नगरविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार प्रारूप प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत आक्षेप व सूचना मागविण्यात आले होते. या कालावधीत सुमारे ६ हजार आक्षेप दाखल झाले होते. यावर १२ व १३ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली.
सुनावणीत मांडलेले मुद्दे
सुनावणीत फक्त ८२८ नागरिक प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यावेळी नागरिक आणि राजकीय पक्षांनी अनेक गंभीर मुद्दे मांडले. प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमा (नदी, डोंगर, मुख्य रस्ते) यांचा विचार करण्यात आलेला नाही, काही प्रभाग अनावश्यकरीत्या फोडून-जोडून तयार करण्यात आले, त्यामुळे नागरिकांच्या क्षेत्रांची एकात्मता बिघडली, असे आरोप करण्यात आले. या बदलांचा परिणाम आगामी प्रभाग आरक्षणावरहोण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेत कोणते बदल स्थान मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंतिम आराखडा कधी जाहीर होणार?
राज्य सरकारच्या कार्यक्रमानुसार ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. हा आराखडा निवडणूक आयोगाकडून महापालिकेला पाठविण्यात येईल. २ ऑक्टोबर गांधी जयंती असल्याने शासकीय सुट्टी, ४ आणि ५ ऑक्टोबरला शनिवार-रविवार सुट्टी असल्याने अंतिम आराखडा ३ ऑक्टोबरपर्यंतच महापालिकेकडे येईल, असे निश्चित मानले जात आहे.