कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवावे? किती दिवसांत पूर्ण होतो प्रक्रिया.. आवश्यक कागदपत्रे कोणती जाणून घ्या..
Maratha Caste Certificate । पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आता मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवणे शक्य होणार आहे. सरकारने गाव आणि तालुका पातळीवर समित्या स्थापन केल्या असून, 21 ते 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. (How to get Maratha-Kunbi caste certificate)
Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया
१. अर्ज सादर करा
* कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी अर्ज तालुकास्तरीय समितीकडे सादर करावा.
* उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे अर्ज दाखल करावा.
२. तपासणी प्रक्रिया
* तालुकास्तरीय समिती अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी करून तो गाव पातळीवरील समितीकडे पाठवेल.
* गाव पातळीवरील समिती (ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश) अर्जदाराची चौकशी करेल.
* चौकशी पोलिस पाटील आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत होईल.
३. कागदपत्रांची तपासणी
* गाव पातळीवरील समिती जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला आणि वडिलोपार्जित कागदपत्रे तपासेल.
* चौकशी अहवाल तयार करून तो तालुकास्तरीय समितीकडे पाठवला जाईल.
४. अंतिम निर्णय
* तालुकास्तरीय समिती अहवालाचे अवलोकन करून शिफारशी सह अर्ज सक्षम प्राधिकरणाकडे पाठवेल.
* विहित कार्यपद्धतीनुसार 21 ते 45 दिवसांत प्रमाणपत्र जारी केले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
* अर्जदार मराठा समाजातील भुधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असावा.
* जमिनीच्या मालकीचा पुरावा (उदा. 7/12 उतारा) सादर करावा.
* जमिनीचा पुरावा नसेल, तर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे.
* कुळातील इतर व्यक्तींना मिळालेले कुणबी प्रमाणपत्र किंवा त्यासंबंधी प्रतिज्ञापत्र सादर करावे.