TRAI New Recharge Rules 2026 : 28 दिवसांच्या रिचार्जला पर्याय; कॉलिंग-स्मएससाठीही स्वतंत्र प्लॅन
TRAIचे नवे नियम; 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचे Voice-SMS-only पर्याय
TRAI New Recharge Rules 2026 : नवी दिल्ली : प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) रिचार्जच्या पर्यायांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. 22 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या ‘Telecom Consumers Protection (13th Amendment) Regulations, 2026’ अंतर्गत ग्राहकांना अधिक लवचिक Voice आणि SMS-only Special Tariff Vouchers (STVs) उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. (TRAI) विशेषतः ज्या वैधतेचे Voice, SMS आणि Data एकत्र असलेले STV उपलब्ध आहेत, त्या 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेसाठी संबंधित Voice-SMS-only STV उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. अशा व्हाउचरच्या दरातही योग्य प्रमाणात कपात करण्याची तरतूद आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना डेटा असलेला प्लॅन घेण्याची गरज राहणार नाही.
28 दिवसांच्या रिचार्जचा मुद्दा काय?
अनेक प्रीपेड प्लॅनची वैधता 28 दिवसांची असल्याने वर्षभरात 12 महिन्यांपेक्षा अधिक वेळा रिचार्ज करावा लागतो, अशी ग्राहकांची तक्रार आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनीही हा मुद्दा संसदेत उपस्थित करून 30 दिवसांच्या वैधतेच्या रिचार्जची मागणी केली होती. नव्या नियमांनंतर त्यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. मात्र, TRAIच्या नियमांचा अर्थ असा नाही की सर्व 28 दिवसांचे प्लॅन बंद करण्यात येणार आहेत. TRAIच्या विद्यमान माहितीनुसार दूरसंचार कंपन्यांना 30 दिवसांचा तसेच महिन्याच्या त्याच तारखेला नूतनीकरण होणारा प्लॅन उपलब्ध करून देण्याची तरतूद आधीपासून आहे. नव्या सुधारणेचा मुख्य भर Voice-SMS-only पर्याय अधिक व्यापक करण्यावर आहे. (TRAI)
इंटरनेट नको? फक्त कॉल आणि SMSचा पर्याय
नव्या नियमांमुळे केवळ कॉलिंग आणि SMS वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक पर्याय मिळणार आहेत. एखाद्या कंपनीकडे 28 दिवस, 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचा Voice-SMS-Data प्लॅन असेल, तर त्याच वैधतेशी संबंधित Voice-SMS-only STV उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, महिन्याच्या त्याच तारखेला नूतनीकरण करता येणारा Voice-SMS-only पर्याय उपलब्ध करून देण्याचीही तरतूद आहे. एखाद्या महिन्यात ती तारीख अस्तित्वात नसल्यास त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी नूतनीकरण करण्याची व्यवस्था असेल.
30 दिवसांपेक्षा जास्त वैधतेचाही पर्याय
नव्या चौकटीत 30 दिवसांपेक्षा जास्त वैधतेच्या STVशी संबंधित किमान एक Voice-SMS-only STV उपलब्ध करून देण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार आणि बजेटनुसार रिचार्ज निवडण्याचे अधिक पर्याय मिळणार आहेत.
नियम कधी लागू होणार?
TRAIने 22 सप्टेंबर 2026 रोजी 13वा दुरुस्ती नियम जारी केला. अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांनी हे नियम लागू होणार आहेत. त्यानंतर दूरसंचार कंपन्यांना नव्या तरतुदींनुसार आपल्या STVमध्ये आवश्यक बदल करावे लागतील. (TRAI) TRAIच्या मते, या सुधारणांचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार अधिक पर्याय उपलब्ध करून देणे, विशेषतः डेटाची गरज नसलेल्या आणि कमी कालावधीचे रिचार्ज पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी Voice-SMS-only पर्याय वाढवणे, हा आहे.

