...

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोरच पुण्यात ’50 खोके एकदम ओके’ घोषणांचा आवाज घुमला

 पुणे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, शिवसेनेत दोन गट पडले. त्यातच, शिवसेनेतील फुटीनंतर 50 खोके घेऊन आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी केली. त्यात ५० खोक्के एकदम ओक्के ही घोषणा प्रसिद्ध झाली. परंतु सध्या ही घोषणा देणे ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंद केले आहे. मात्र, पुण्यातील निगडी येथे राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोरच 50 खोके एकदम ओके घोषणांचा आवाज घुमला. त्यामुळे सत्तार यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. (Punyaat 50 khoke Ekdam Ok’ Announcement In Front Of Minister Abdul Sattar)

 

 

 

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी सातत्याने हा आरोप केला होता. त्यामुळे, 50 खोके एकदम ओके अशा घोषणाही अनेक ठिकाणी देण्यात आल्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बंद झालेल्या या घोषणा अचानक देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 50 खोक्के, एकदम ओक्के असे म्हणत पुण्यात मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना डिवचण्यात आलं. पुण्यातील या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओक्केच्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि.माडगूळकर नाट्यगृह दणाणून सोडले.

 

 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी पुण्यातील निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने येथील परिषदेत चर्चा करण्यात येणार होती.

 

या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते.

 

राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार नियोजीत कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहचले. तसेच, तेथे आल्यानंतर त्यांनी केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल, असे वक्तव्य करु नका, असे म्हटले. तसेच, मला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. मात्र, यावेळी बाजार समितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. येथील नाट्यगृहात पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच, अब्दुल सत्तारांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय.. अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

Local ad 1