पुणे, 9 जानेवारी: पुणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील जाहीर सभेत आक्रमक भाषण दिले. त्यांनी पुणेकरांना भरभरून मतदान करून विरोधकांना कात्रजचा घाट दाखवण्याचे आवाहन केले आणि पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. (pune municipal election 2026 eknath shinde katraj sabha)
“मतदारांची मकर संक्रांती गोड होणार की राजकीय ‘वाण’ मध्ये हरवणार?”
शिंदेंने सांगितले की, महापालिकेसाठी शिवसेनेची पाटी कोरी असली तरी विकासाची अक्षरे ती पाटीवर लिहिण्याची ताकद शिवसेनेकडे आहे. ‘महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत आहे, त्यामुळे विजय आमचाच होणार,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत नीलम गोऱ्हे, तानाजी सावंत, रवींद्र धंगेकर, प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, नमेश बाबर, आबा बागुल यांसह सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते. शिंदे यांनी महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले; प्रत्येक सभा, रोड शो आणि प्रचार रॅलीत ‘लाडक्या बहिणींची’ संख्या लक्षणीय वाढत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला ठाम उभ्या असतात, त्यांचा मतपेटीत क्रमांक पहिलाच असतो. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेत हॅट्ट्रिक झाली आहे, आता महापालिकेत चौकार मारायचा आहे.” शिंदेंनी पुणे शहराला विकासाचे अमृत देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “आमचा अजेंडा सत्ता नाही, तर विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा विकास हाच शिवसेनेचा झेंडा आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा अनुभव सांगत कात्रजची वाहतूक कोंडी देखील दूर होणार असल्याचे आश्वासन दिले.
शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली. “मी बोलतो ते करतो. एकदा कमिटमेंट केली की मागे हटत नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी कोर्टाच्या विरोधानंतरही योजना सुरू राहिल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांचा मान-सन्मान महत्वाचा असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, शिवसेनेत मालक-नोकर नाहीत, सर्वजण सहकारी आहेत. छातीवर वार घेणारे, कार्यकर्त्यांसाठी पुढे उभे राहणारे नेते आणि पदाधिकारी आमच्याकडे आहेत.
विकासकामांची माहिती देताना शिंदे म्हणाले, प्रभाग 38 साठी पाणीपुरवठा योजना – 2 कोटी रुपये, रस्ते – 25 कोटी रुपये, जांभूळवाडी तलाव सुशोभीकरण व जॉगिंग ट्रॅक – 58 कोटी रुपये, ड्रेनेज लाईनसाठी नरेंगाव, जांभूळवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी 159 कोटी रुपये, कात्रज परिसरातील रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठा सुधारणे हा देखील शिंदेंचा अजेंडा आहे.
शिंदे म्हणाले की, शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्रभर घराघरात पोहोचली आहे. उद्योग, रोजगार, पर्यटन, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, ऐतिहासिक वारशाचे जतन, गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती ही त्यांची प्राथमिकता आहे.
समारोप करताना शिंदे यांनी 15 जानेवारीची महापालिका निवडणूक फक्त महापालिकेची नव्हे, तर कात्रज व पुण्याच्या भविष्यातील निर्णायक असल्याचे सांगितले. त्यांनी पुणेकरांना धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले आणि विजयाचा उत्सव 16 जानेवारीला साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

