पुणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक ३ ने खेड तालुक्यातील नाणेकरवाडी (मुत्केवाडी) परिसरात मोठी कारवाई करत बनावट देशी व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. खात्रीलायक माहितीच्या आधारे २५ नोव्हेंबर रोजी अवैध मद्यविक्री अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान देशी दारू पावर लाईन (१८० मिली व ९० मिली)च्या ६४४ बनावट सीलबंद बाटल्या, तसेच विदेशी मद्याच्या ७१ बनावट बाटल्या, आणि दारू तयार करण्याचे साहित्य असे मोठ्या प्रमाणात बनावट मद्य जप्त झाले.
या प्रकरणी अहमदसाब पठाण आणि हरीष ब्रिजेश कुमार चंद्रा यांना अटक करण्यात आली. आरोपींना खेड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी समोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपींना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
या कारवाईत निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय. एम. चव्हाण, पी. ए. ठाकरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. डी. साठे, तसेच जवान अमर कांबळे, अनिल दांगट, गिरीश माने, जगन्नाथ चव्हाण, जयदास दाते आणि वाहनचालक शरद हांडगर यांनी सहभाग घेतला.
राज्यात बनावट व प्रतिबंधित मद्यविक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने, अशा प्रकारची माहिती नागरिकांनी त्वरित राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केले.

