पुणे: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता अबाधित ठेवण्यासाठी पुणे महापालिकेने आता मनुष्यबळ भरतीस वेग दिला आहे. गुरुवारी ९८० पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली असून, लवकरच या भरती प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याची माहिती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, विशेषतः प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी व प्रशासनिक पदांसाठी भरती करणे अत्यावश्यक होते. याकडे यापूर्वी दुर्लक्ष झाल्यामुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) पुणे महापालिकेला नोटीस बजावली होती. आता मात्र सुधारणा करत ही भरती मंजूर करण्यात आली आहे.
महाविद्यालय आणि संबंधित रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या सध्याच्या कंत्राटी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांच्या करारामध्येही मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे सध्याचा वैद्यकीय सेवेचा गाडा पुढे सुरू ठेवता येणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून नव्याने पदभरतीसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये अनुभव, पात्रता आणि गुणवत्तेनुसार निवडप्रक्रिया राबवली जाईल. आयुक्त राम यांनी स्पष्ट केलं की, “या भरतीमुळे वैद्यकीय शिक्षण आणि उपचार सेवा दोन्हीमध्ये गुणवत्ता वाढवता येईल. NMC च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही पदभरती तातडीने करण्यात येणार आहे.”
मान्यता टिकवण्यासाठी निर्णायक पाऊल
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दिलेल्या चार महिन्यांच्या डेडलाईनमध्ये सर्व सुधारणा पूर्ण करणे गरजेचे आहे. रुग्णालय व महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांबरोबरच प्रशिक्षित व पर्याप्त मनुष्यबळ असणे हा एक महत्त्वाचा निकष आहे. ९८० पदांच्या भरतीला मंजुरी देणे हे याच दिशेने टाकलेले एक निर्णायक पाऊल मानले जात आहे.
कोणत्या पदांवर भरती होणार?
प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक
वैद्यकीय अधिकारी
नर्सेस
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
फार्मासिस्ट
प्रशासनिक कर्मचारी