...

Pune Municipal Election।पुण्यात भाजपमध्ये आयात उमेदवार वाढले, निष्ठावंतांची धाकधूक !

वडील इच्छुकांच्या मुलाखती घेत असतानाच मुलगा भाजपरमध्ये

Pune Municipal Election।पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीची (Pune Municipal Election) धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे (Surendra Pathare BJP) यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश केला आहे. (Bapu Pathare son joins BJP) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील दोन माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे भाजपने दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकाचवेळी जोरदार झटका दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर भाजपमध्ये ‘आयाराम-गयाराम’ संस्कृती वाढत असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (pune municipal election ncp leaders join bjp)

 

 

अमेरिका, चीन, रशियापेक्षा व्यापारासाठी भारताला कोणता देश अधिक योग्य ; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हे प्रवेश झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक योगेश मुळीक आदी उपस्थित होते. वडगावशेरी, खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांना गळाला लावल्याने भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

 

पुण्यात बनावट देशी व डिफेन्स ओन्ली मद्यावर छापा | 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र कणव चव्हाण, वडगाव बुद्रुक-धायरी भागातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगरसेवक विकास दांगट, पाषाण भागातील माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, धनकवडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी नगरसेवक बाळासाहेब धनकवडे आणि वारजे भागातील माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणाऱ्या पॅनलमध्ये सचिन दोडके यांचा समावेश होता. त्याच दोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

याशिवाय वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे नारायण गलांडे, खंडू लोंढे, हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या वैशाली तुपे, विराज तुपे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी होले (शिवरकर), राजेंद्र लोखंडे, बाबा शिवरकर, विद्यानंद बोंद्रे, इंदिरा तुपे यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. तसेच पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे डॉ. अमोल देवडेकर, खडकवासला गावचे माजी सरपंच संतोष मते, वारजेचे भारतभूषण बराटे आणि हडपसरचे प्रशांत तुपे यांनीही भाजपची वाट धरली आहे.

 

 

आयात विरुद्ध निष्ठावंत संघर्ष तीव्र होणार

काही महिन्यांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) मधील पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अनेक माजी नगरसेवक ‘वेटिंग’वर होते. आता एकूण २२ जणांच्या प्रवेशामुळे भाजपमधील निष्ठावंत इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, आयात विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

 

 

आमदार तापकीरांचा विरोध डावलला

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी सचिन दोडके आणि विकास दांगट यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. दोडके यांच्या प्रवेशावरून आमदार तापकीर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र विरोध डावलून अखेर दोडके यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

 

 

वडील मुलाखती घेत असताना मुलगा भाजपमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणाऱ्या पॅनलमध्ये आमदार बापू पठारे यांचा समावेश होता. मात्र त्याच पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रवेश सुमारे तीन महिने रखडला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

 

तटकरे यांच्या फोनमुळे प्रवेश थांबले

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील आणखी काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्यानंतर अनेकांचे प्रवेश तात्पुरते थांबवण्यात आल्याची माहिती आहे.

 

 

 

Local ad 1