...

पुण्यात बनावट स्कॉच व विदेशी मद्याचा 15 लाखांचा साठा जप्त | उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नववर्ष–नाताळ पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

पुणे : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात मद्यविक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या संधीचा गैरफायदा घेत मद्य तस्करांकडून बनावट तसेच परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक व विक्री सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत उच्च दर्जाची बनावट स्कॉच व बनावट विदेशी मद्याचा सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (pune duplicate scotch foreign liquor seized excise raid)

 

पुण्यात जागावाटपाने पेटले राजकारण ; महायुती–मविआत अंतर्गत संघर्ष !

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सोमवारी दुपारी २ ते साडेचार वाजेदरम्यान मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील ताडीगुत्ता चौक परिसरात संशयित वाहन क्रमांक MH 12 LN 8003 ची तपासणी केली. यावेळी विविध ब्रँडच्या परराज्यातील मद्याच्या तसेच फक्त सैन्याकरिता राखीव असलेल्या बनावट स्कॉचच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी प्रथमेश विजय कान्हेकर यास अटक करण्यात आली. पुढील तपासात आरोपीच्या बिबवेवाडी येथील (कोठारी कॉलनी) राहत्या घरातून उर्वरित बनावट मद्य जप्त करण्यात आले. यामध्ये एक चारचाकी व एक दुचाकी वाहन, बनावट स्कॉच, मोबाईल असा ५,४४,५३५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

लोणावळा ग्रामीण भागात बनावट मद्य वाहतूक उघड

दुसऱ्या कारवाईत तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी ३.३० वाजता काळे कॉलनी–कामशेत रोडवरील येळसे फाटा परिसरात सापळा रचत ऑटो रिक्षा क्रमांक MH 12 WR 6518 तपासली. त्यामध्ये मॅकडॉल्स नं. 1, इम्पिरियल ब्ल्यू व रॉयल स्टॅग या नावाने विक्रीसाठी तयार केलेल्या बनावट विदेशी मद्याच्या ४८० हून अधिक बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी रामदास हरिभाऊ शेळके यास अटक करण्यात आली असून ३.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोथरूडमध्ये बनावट मद्य निर्मितीचा पर्दाफाश

तपासादरम्यान कोथरूड येथील श्रीतेज पान स्टॉल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स येथे छापा टाकण्यात आला. येथे बनावट मद्य भरण्यासाठी वापरण्यात येणारी स्टील टाकी, गोवा राज्य निर्मिती क्लासिक व्हिस्की, बनावट ब्लेंड, कॅप, लेबल व बॉटल्स जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी चेतन दत्तात्रय खांडेकर यास अटक करण्यात आली असून ६.७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

एकूण जप्ती सुमारे 15 लाखांवर

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण दोन आरोपींना अटक, दोन चारचाकी वाहने, एक ऑटो रिक्षा, बनावट विदेशी मद्य व मोबाईलसह  ९,९४,३११ रुपयांचा मुद्देमाल  जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात २१ पथके कार्यरत

जिल्ह्यातील दोन महानगरपालिका निवडणुका, नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, साठवणूक व विक्रीविरोधात २१ विशेष पथके कार्यरत असून रात्रीची गस्त आणि वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. अवैध मद्याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९९ किंवा दूरध्वनी ०२०-२६१२७३२१ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

Local ad 1